Thu, Jan 17, 2019 02:46होमपेज › Aurangabad › ‘गडचिरोली भेजा तो भी पुरी लगनसे काम करुंगा’

‘गडचिरोली भेजा तो भी पुरी लगनसे काम करुंगा’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

मी एक जबाबदार आयएएस अधिकारी आहे. आयएएस अधिकार्‍यांसाठी इच्छा-अनिच्छेचा प्रश्‍न नसतो. मला त्याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मला मनपाचा चार्ज नको, असे मी शासनाला कसे म्हणू शकतो? खरे सांगायचे तर या केवळ आणि केवळ अफवा आहेत. मी सध्या पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणे पालिकेचे काम करत आहे. सिर्फ यही नही लेकीन अगर कल मुझे गडचिरोली भेजा गया तो वहाँ भी उसी दम से काम करुंगा, अशा शब्दांत प्रभारी मनपा आयुक्‍त तथा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी त्यांची भूमिका मांडली. 

कचराकोंडीच्या प्रश्‍नावरून राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वीच मनपा आयुक्‍त पदावरून दीपक मुगळीकर यांची उचलबांगडी केली. या आदेशांसोबतच मनपा आयुक्‍त पदाचा अतिरिक्‍त पदभार जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे सोपविण्यात आला. मागील दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी राम हे कचराकोंडीच्या विषयावर अहोरात्र काम करीत आहेत. त्यातच आता राम यांनी मनपाचा चार्ज नको, अशी विनंती शासनाकडे केली असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सोमवारी त्याचा इन्कार केला. 

ते म्हणाले, मी 2008 सालच्या बॅचचा आयएएस अधिकारी आहे. मी साडेतीन वर्षे बीडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काढले आहेत. कुठे काम करायचे किंवा कुठे नाही याबाबत शासन सेवेत इच्छा- अनिच्छेचा प्रश्‍न नसतो, एवढे मला नक्‍कीच माहीत आहे. मग मी अशी विनंती कशाला करेन. ही निव्वळ अफवा आहे. उलट मी मागील दहा दिवसांपासून पालिकेच्या विषयांवर सतत काम करत आहे. सध्या पालिकेत कचराकोंडीचा विषय सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यावर लक्ष केंद्रित केले आहे. इथेच नाही पण उद्या गडचिरोलीला बदली झाली तरी तिथेही याच क्षमतेने आणि उत्साहाने काम करेन, असेही राम म्हणाले.

Tags : I am a responsible IAS officer
 


  •