Mon, Aug 26, 2019 01:58होमपेज › Aurangabad › प्लॉटिंगचा वाद अन् अनैतिक संबंधाची किनार

प्लॉटिंगचा वाद अन् अनैतिक संबंधाची किनार

Published On: Mar 05 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 1:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

हुसेन खान अलियार खान ऊर्फ शेरखान (46, रा. पेन्शनपुरा) खून प्रकरणाला प्लॉटिंगच्या वादाबरोबरच अनैतिक संबंधाची किनार असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 27 डिसेंबर 2017 रोजी मध्यरात्री 1 वाजता लक्ष्मी कॉलनीत बारापुल्ला गेटजवळ शेरखान यांना भरधाव दुचाकीवर लोखंडी पाईप डोक्यात मारून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांच्या मृत्यूनंतर राक्षसी आनंद घेत आरोपी नाचले होते, असे चौकशीत समोर आल्यामुळे संपत्ती आणि अनैतिक संबंध यातूनच हा प्रकार घडल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. 

दरम्यान, शेरखान खून प्रकरणात शनिवारी (दि. 3) अटक केलेल्या अक्रम खान गयाज खान (27, रा. आहेर जटवाडा), शेख अश्पाक शेख इसाक ऊर्फ अश्पाक पटेल (25, रा. शहाबाजार) आणि आकाश ऊर्फ शेर्‍या उत्तम पडूळ (22, रा. अनिसा शाळेजवळ, जिन्सी) या तीन आरोपींना न्यायालयाने 7 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी दिली. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेरखान हे वादग्रस्त प्लॉटिंगची खरेदी-विक्री करण्याचा व्यवहार जास्त करायचे. यातून त्यांचे अनेकांशी शत्रूत्व निर्माण झाले होते. अक्रम खान आणि शेरखान यांचाही प्लॉटिंगच्या व्यवसायावरूनच वाद होता. शेरखान यांनी खरेदी केलेल्या एका प्लॉटचा रस्ता अक्रम खान याच्या प्लॉटमधून जात होता. त्यावरून त्यांच्यात अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. तसेच मृत शेरखान हासुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचाच होता. त्याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण यांसारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध हद्दपारीचा प्रस्ताव छावणी पोलिसांनी पाठविला होता. या विनयभंगाच्या तक्रारीचा काही संबंध आहे का, याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. 

दरम्यान, पोलिस कोठडीत आरोपींची कसून चौकशी करण्यात येईल. त्यांच्याकडून आणखी कोणी साथीदार होते का? त्यांचा नेमका उद्देश काय? या बाबींची उकल करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे पोलिस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले.