Sat, Aug 17, 2019 16:37होमपेज › Aurangabad › ‘रोगराई’साठी सज्ज व्हा !

‘रोगराई’साठी सज्ज व्हा !

Published On: May 27 2018 1:17AM | Last Updated: May 27 2018 12:33AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कचराकोंडीच्या शंभर दिवसांच्या काळात मनपाकडून शहरात हजारो टन कचरा जमिनीत पुरण्यात आला. तसेच अजूनही शेकडो टन कचरा मोकळी मैदाने आणि रस्त्यालगत पडलेला आहे. आता पावसाळ्यात पाण्यामुळे हा कचरा कुजून त्यापासून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच शहरातील भूजलही प्रदूषित होण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे. 

औरंगाबाद शहरात रोज 450 टन कचरा निघतो. मागील सुमारे 32 वर्षे हा कचरा नारेगाव येथील डेपोत नेऊन टाकला जात होता, परंतु आता 16 फेब्रुवारीपासून हा डेपो बंद झाला आहे. त्यामुळे पालिकेला या दैनंदिन कचर्‍याची विल्हेवाट लावणे कठीण झाले आहे. शंभर दिवसांनंतरही पालिकेचा प्रक्रिया प्रकल्प सुरू झालेला नाही. या शंभर दिवसांत मनपाच्या घनकचरा विभागाने हजारो टन कचरा जमिनीत पुरला. कंपोस्टिंगच्या नावाखाली वॉर्डावॉर्डांत खड्डे करून त्यात ओला कचरा टाकत त्यावर माती टाकली. मिसारवाडीसह किती तरी ठिकाणी अर्धवट बुजलेल्या विहिरींमध्येही कचरा टाकला गेला. सध्याही शहरात शेकडो टन कचरा मोकळ्या मैदानांमध्ये तसेच रस्त्यालगत पडून आहे. मात्र, आता पावसाळा जवळ आल्याने आरोग्याचा धोका वाढला आहे. पावसाळ्यात पाण्यामुळे जमिनीतील तसेच उघड्यावरील कचरा कुजणार आहे. त्यामुळे त्यावर डास, माशा आणि जंतूंची उत्पत्ती वाढणार आहे. परिणामी, यापासून डेंग्यू, मलेरियासारखे आजार शहरात पसरू शकतात, अशी भीती व्यक्‍त होत आहे. एवढेच नव्हे तर जमिनीत पुरलेल्या कचर्‍यामुळे पावसाळ्यात संपूर्ण शहरातील भूजलही प्रदूषित होणार आहे. पावसाचे पाणी कचर्‍यातून पाझरून जमिनीत जाईल. त्यामुळे विंधन विहिरी आणि विहिरींचे पाणी दूषित होऊ शकते.

कचरा कुजल्यामुळे रोगराईचा धोका वाढतो. कुजलेल्या कचर्‍यावर डासांची उत्पत्ती होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरू शकतात. पाण्याच्या जलवाहिनीला कुठे लिकेज असेल आणि त्यातून कचर्‍याचे पाणी आत शिरले तर पाणी प्रदूषित होऊन जलजन्य आजार देखील पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
- डॉ. मंगला बोरकर,

जेरियाट्रिक्स विभाग प्रमुख (घाटी) पालिका प्रशासन गप्पच

कचराकोंडीचा सामना करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले. आता पावसाळ्यात कचर्‍यामुळे रोगराई उद्भवण्याचा धोका आहे. ही रोगराई रोखण्यासाठीदेखील पालिकेकडून पाउले उचलताना दिसत नाहीत. पालिकेचा आरोग्य विभाग, घनकचरा विभाग हे दोघेही याबाबत गप्पच आहेत.