होमपेज › Aurangabad › घाटीतील बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी

घाटीतील बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी

Published On: Dec 02 2017 2:05AM | Last Updated: Dec 02 2017 2:03AM

बुकमार्क करा

औरंगाबाद ः प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) मूत्रपिंड विभागाच्या निकृष्ट बांधकामाची उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी केली जाणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे सांगितले.

घाटीच्या मूत्रपिंड विभागाची अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली आलिशान इमारत निकृष्ट बांधकामामुळे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या इमारतीचे कॉलम भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे जमिनीपासून तडकले आहेत. त्यामुळे बाहेरून आकर्षक दिसणारी ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळून रुग्णांच्या जिवावर बेतू शकते. ‘तीन वर्षांत कॉलमला तडे’, या मथळ्याखाली दैनिक ‘पुढारी’ने शुक्रवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीनिमित्त शहरात आलेल्या चंद्रकांत पाटील यांनी या वृत्ताची गंभीर दखल घेतली. निकृष्ट बांधकामाचा त्यांनी अधिकार्‍यांना बैठकीतच जाब विचारला. 

मूत्रपिंंड विभागाच्या निकृष्ट बांधकामाचे वृत्त मी सकाळीच वाचले. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. उच्चस्तरीय समितीची नियुक्‍ती करून निकृष्ट बांधकामाची चौकशी केली जाणार असून, दोषी असणार्‍यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.

रुग्णाच्या जिवाशी खेळ

सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असताना घाटी रुग्णालयाचे प्रशासन मात्र दुर्लक्ष करून रुग्णांच्या जिवाशी खेळत आहे. तडे गेलेले कॉलम सिमेंट, विटाने भरण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मूत्रपिंड विभागाच्या इमारतीची तातडीने पाहणी केली जाईल, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी जाहीर केले होते, मात्र त्या शुक्रवारी फिरकल्या नाहीत. अधीक्षक डॉ. शिवाजी सुक्रे यांनीदेखील या प्रकाराकडे डोळेझाक केली आहे.