वरठाण : प्रतिनीधी
पळाशी (ता.सोयगाव) येथे गुरुवारी (ता. २७) रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत घेण्यात आलेल्या शेतीशाळेत खरीप हंगामातील पिकांचे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके दाखवून सरी वरंबा पद्धतीने लागवड करण्याची माहिती देण्यात आली.
बनोटी मंडळातील गावे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजनेत समाविष्ट करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी योजनेंतर्गत विविध योजना राबविल्या जात आहेत. पारंपारिक पीक पद्धतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्यासाठी कृषी विभागाकडून जागृती करत कृषी पूरक साहित्य अंशदानात पुरविण्यात येत आहे. गुरुवारी पळाशी येथील विरसिंग राजपुत यांच्या शेतात घेण्यात आलेल्या शेतीशाळेत मका, मुग, तुर, ज्वारी बियांणाची बीजप्रकिया प्रात्यक्षिके करुन दाखवून सरी वरंबा पद्धतीने पिकाची लागवड करण्यावर भर देण्यात आला.
तसेच मका-मुग व कापुस-मुग किंवा तुर या आंतरपिकात चार ओळी मका व दोन ओळी मुग किंवा तुर यांची लागवड केल्याने लष्करी अळीचे नियंत्रण करता येत असल्याने पिकांचा किडनियंत्रण खर्च वाचून उत्पादन वाढविता येत असल्याचे कृषी सहाय्यक संभाजी पाटील यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
यावेळी कृषी सहाय्यक राधिका सोंळुके, प्रकाश परदेशी, राजेंद्र परदेशी, संगिताबाई राजपुत, विजय सोनवणे, राहुल राजपुत कविता राजपुत, शितल राजपुत, युवराज सोनवणे, छायाबाई राजपुत, रेखाबाई भिल्ल आदींसह शेतकरी उपस्थित होते.