Tue, Apr 23, 2019 09:42होमपेज › Aurangabad › पालकमंत्री सावंत यांची पुन्हा शहराकडे पाठ

पालकमंत्री सावंत यांची पुन्हा शहराकडे पाठ

Published On: Jul 08 2018 1:59AM | Last Updated: Jul 08 2018 1:59AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

पोलिस आयुक्‍तालयाच्या उद्घाटन समारंभास गैरहजर राहून पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी शहराकडे पुन्हा पाठ फिरवली आहे. आमदारकी गेल्याने नाराज असलेल्या सावंत यांनी आठवडाभरात दुसर्‍यांदा शहरात येणे टाळले. 

पोलिस आयुक्‍तालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. पालकमंत्री या नात्याने डॉ. दीपक सावंत यांनादेखील या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते, मात्र शिवसेनेने विधान परिषदेची संधी न दिल्याने नाराज असलेल्या पालकमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. औरंगाबादेत उसळलेल्या दंगलीनंतर पालकमंत्र्यांनी मे महिन्यात शहरास धावती भेट दिली होती. त्यानंतर बदलत्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेने मुंबई पदवीधर मतदारसंघातून डॉ. सावंत यांना उमेदवारी दिली नाही.  त्यामुळे नाराज झालेल्या डॉ. सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ठाकरे यांनी अद्याप हा राजीनामा स्वीकारला नसल्याने डॉ. सावंत हे पालकमंत्रिपदावर कायम आहेत. डॉ. सावंत यांनी आपला दौरा रद्द केल्याने काही दिवसांपूर्वी जिल्हा नियोजन समितीची बैठक अचानक रद्द करावी लागली होती.