Fri, Apr 26, 2019 01:21होमपेज › Aurangabad › रोजगाराअभावी विकासगती मंदावली

रोजगाराअभावी विकासगती मंदावली

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 17 2018 11:33PMपाटोदा : महेश बेदरे

निजामकालीन तालुका अशी पाटोदाची ओळख आहे, मात्र अद्यापही या परिसरात रोजगारांच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्याने या भागातील जवळपास 70 टक्के बेरोजगार ऊसतोडणीसाठी राज्यासह परराज्यातही विविध ठिकाणी जातात. त्यामुळे या तालुक्याच्या सर्वांगीन विकासाची गती आजही मंदावलेलीच आहे. तालुक्यातील विकासाच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचे असलेले विषय आजही प्रलंबितच आहेत.

पाटोदा तालुक्याला निसर्गाने अगदी भरभरून दान दिले आहे. या तालुक्यातील अनेक ठिकाण मोठी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येऊ शकतात यामध्ये संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेला सौताड्याचा रामेश्‍वर धबधबा तसेच देशातील एकमेव मयूर अभयारण्य नायगाव अशा ठिकाणांचा समावेश आहे. सौताडा या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनी वनवासाच्या काळात निवास केल्याची आख्यायिका असून या ठिकाणी अत्यंत निसर्गरम्य परिसरात रामेश्‍वर दरीत विंचरणा नदीतून शेकडो फूट उंचीवरून फेसाळत धबधबा कोसळतो हे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते मात्र या ठिकाणी पर्यटनस्थळाप्रमाणे निवास, सुरक्षा अशा कोणत्याही सुविधा नाहीत. या ठिकाणाचा जर विकास झाला तर येथे मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याच प्रमाणे पाटोदा तालुक्यातच असणारे नायगाव मयूर अभयारण्य देखील सुविधांपासून वंचित आहे. या ठिकाणी मोरांसह इतर वन्यजीवांचीही मोठी संख्या आहे तसेच या परिसरातील डोंगरात सीताफळ, करवंद अशा रानमेव्यासह दुर्मिळ वनौषधीही मोठ्या प्रमाणात आहेत.

या ठिकाणाचा योग्य विकास झाल्यास येथेही पर्यटकांची संख्या वाढून मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्याचप्रमाणे पाटोदा तालुक्यात अनेक महत्वाची धार्मिक ठिकाण तसेच पूरातन मंदिर आहेत या मध्ये पिंपळवंडी येथे दुर्मिळ मंदिरांपैकी एक असलेल्या कार्तिकस्वामींचे मंदिर आहे.