Sat, Aug 17, 2019 16:48होमपेज › Aurangabad › खासगी कार्यक्रमासाठी वापरली शासकीय वाहने

खासगी कार्यक्रमासाठी वापरली शासकीय वाहने

Published On: Dec 18 2017 2:28AM | Last Updated: Dec 17 2017 11:52PM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

शहर पोलिस दलात शासकीय वाहनांचा गैरवापर होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याने घरगुती कार्यक्रमासाठी चक्क शासकीय वाहन आणि कर्मचार्‍यांचा ताफा दिमतीला ठेवल्याचा गंभीर प्रकार रविवारी समोर आला. विशेष म्हणजे, सुटी असतानाही काही कर्मचार्‍यांना ड्युटीवर बोलावून त्यांना वाहने घेऊन घरी येण्यास बजावले. तेथून आपल्या पाहुणे आणि साहित्याची एका हॉटेलपर्यंत वाहतूक करण्यात आली. 

शहर पोलिस दलात अनेक नवीन चारचाकी गाड्या दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव यांनी या गाड्यांचे वाटपही केले. यावर क्रमांक नसतानाही गाड्यांचा वापर सुरू झाला. तक्रारी आल्यावर पोलिस आयुक्‍तांनीच शासकीय कामासाठी गाडी वापरली तर त्यात काही गैर नाही, असा खुलासा केला होता, परंतु आता चक्क खासगी कामासाठी रविवारी एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने चार ते पाच वाहने वापरली. रविवार असतानाही चालकांना ड्युटीवर बोलावून त्यांना शासकीय वाहने घरी नेण्याचे सांगण्यात आले. तेथून ही वाहने पाहुण्यांना घेऊन थेट नियोजित कार्यक्रमस्थळी पोहोचली. त्यासाठी तीन वाहनांचा वापर करण्यात आला. पोलिस आयुक्‍त आणि शहरातील सर्व पोलिस निरीक्षक कार्यक्रमाला हजर होते, हे विशेष.

पोलिस आयुक्‍त म्हणाले होते...

विना क्रमांकाच्या गाड्यांच्या वापराबाबत आयुक्‍त यशस्वी यादव यांना विचारले तेव्हा ते म्हणाले होते की, चांगल्या कामासाठी काही नियम तोडावे लागत असतील तर त्यात काही गैर नाही. विना क्रमांकाची गाडी वापरून कोणालाही काही आर्थिक लाभ होणार नाही. त्यामुळे अशा विषयाकडे दुर्लक्ष केले पाहिजे, परंतु रविवारी एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने पाच शासकीय वाहने वापरली. त्यातील दोन वाहने सातारा भागातील एक बालिकाश्रमातील मुलींना ने-आण करण्यासाठी वापरली, तर तीन वाहने घरच्या पाहुण्यांसाठी वापरली.