Fri, Apr 19, 2019 12:45होमपेज › Aurangabad › घाटीतील लेझर मशीन पाच वर्षांपासून बंद

घाटीतील लेझर मशीन पाच वर्षांपासून बंद

Published On: Dec 21 2017 1:54AM | Last Updated: Dec 21 2017 1:47AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रकाश जाधव

डोळ्यांतील रेटिनासंबंधी बहुतांश आजारात लेझर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. हे तंत्रज्ञान यावर प्रभावी उपाय म्हणून पाहिले जाते. खासगी दवाखान्यात महागडे असलेले हे उपचार गरिबांना परवडत नाहीत. गरिबांचा आधार असलेल्या घाटी रुग्णालयात हे मशीन असूनही ते गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेले आहे. येथील शासकीय रुग्णालयातही ही सुविधा नसल्याने गरीब रुग्णांना रेटिनासंबंधी उपचार करून घेण्यासाठी एक तर खासगी दवाखान्यात जावे लागते किंवा मुंबईला सरकारी रुग्णालयाचा रास्ता धरावा लागतो.

वाढत्या धकाधकीमुळे मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मधुमेही रुग्णांची साखर नियंत्रणात राहिली नाही तर, रेटिनल डिटॅचमेंट, मुख्य नर्व्हचा आजार निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. अशा वेळी लेझर तंत्रज्ञानाचा वापर करून डॉक्टर रक्‍तवाहिन्यांमधील होणारा रक्‍तस्राव किंवा नवीन निर्माण होणार्‍या रक्‍तवाहिन्या थांबवितात. यामुळे नजर वाढते व ती स्थिर राहण्यास मदत होते. लेझर मशीनचे हे मुख्य कार्य आहे. मात्र, याव्यतिरिक्‍तही डोळ्यांच्या विविध आजारांत ते उपयोगी पडते.

घाटीत डोळ्यांच्या आजारावरील उपचारासाठी येणार्‍या रुग्णांची संख्या प्रचंड आहे. यात रेटिनासंबंधी आजार असलेले रुग्णही मोठ्या संख्येने असतात. मात्र, मशीन बंद असल्याने एक तर त्यांना खासगीत जाण्याचा सल्ला दिला जातो किंवा मुंबईला जे. जे. रुग्णालयात जाण्याचे सांगितले जाते. खासगी दवाखान्यांमध्ये लेझर उपचारांचा खर्च हा दीड ते दोन हजार रुपयांपासून सुरू होतो. शहरात शासकीय रुग्णालयामध्ये ही सुविधा नसल्याने गरीब रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.