Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Aurangabad › घाटीत आठ दिवस पुरेल एवढाच रक्‍तसाठा

घाटीत आठ दिवस पुरेल एवढाच रक्‍तसाठा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालयात (घाटी) आठ दिवस पुरेल एवढाच रक्‍तसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत रक्‍तसंकलन शिबिरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने रक्‍त तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

घाटी रुग्णालयात मराठवाड्यास विदर्भ तसेच खानदेशातून गोरगरीब रुग्ण उपचारासाठी येतात. 1200 खाटाच्या या रुग्णालयात दररोज जवळपास 1500 ते 1600 आंतररुग्ण भरती असतात. गुंतागुंतीचे आजार तसेच अपघातांचे रुग्ण हे घाटीतच आणले जात असल्याने येथे दररोज मोठ्या संख्येने रक्‍ताची आवश्यकता भासते. घाटी रक्‍तपेढीतर्फे जिल्हाभरात नियमितपणे रक्‍तसंकलन शिबीर होतात. या शिबिरांच्या माध्यमातून रक्‍तसंकलन केले जाते.

एरव्ही घाटीसाठी रक्‍तदान करणार्‍या अनेक समाजसेवी संघटना आहेत, मात्र उन्हाळ्याच्या दिवसांत येथे नेहमी रक्‍ततुटवडा निर्माण होतो. सद्यःपरिस्थितीतही घाटीत आठ दिवस पुरेल एवढाच रक्‍तसाठा शिल्लक आहे. रक्‍ततुटवडा येऊ नये म्हणून शिबिरे आयोजित केली जात आहेत, मात्र या शिबिरांना म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने घाटीत रक्‍ततुटवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रक्‍तपेढीला आता रक्‍ततुटवडा

जाणवायला लागला आहे, परंतु दररोज रक्‍तसंकलनासाठी कॅम्प आयोजित केले जात आहेत. रक्‍तदान शिबिराचा मुख्य आधार असलेले विद्यार्थी परीक्षा तसेच अभ्यासामुळे रक्‍तदान शिबिराकडे येत नाही. यामुळेच कॅम्पला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. घाटीसाठी रक्‍तदान करण्याचे आम्ही नागरिकांना आवाहन करीत आहोत.    -डॉ. राजन बिंदू     विभागप्रमुख घाटी.

परीक्षेमुळे रक्‍तसंकलन कमी

घाटीसाठी रक्‍तदान करणार्‍यांत महाविद्यालयीन युवकांचा मोठा सहभाग असतो. त्यामुळे रक्‍तदान शिबिरात महाविद्यालयीन युवकांची मोठी गर्दी असते,  मात्र सध्या रक्‍तदान  शिबिरांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. याचे कारण म्हणजे महाविद्यालयीन परीक्षा सुरू आहेत. परीक्षेत आरोग्य समस्या निर्माण होऊ नये म्हणून महाविद्यालयीन युवक रक्‍तदान शिबिरांकडे फिरकत नाहीत. तसेच परीक्षा झाल्यानंतर  ग्रामीण भागातील विद्यार्थी सुटीसाठी गावाकडे जातात. यामुळे रक्‍तसंकलन शिबिरांना प्रतिसाद मिळत नाही.

 

Tags : Aurangabad, Aurangabad news, Government Medical College, Blood stock,


  •