Mon, Aug 19, 2019 11:53होमपेज › Aurangabad › आफ्रिका खंडातील घानात जाणार औरंगाबादचे स्टोव्ह

आफ्रिकेतील घानात जाणार औरंगाबादचे स्टोव्ह

Published On: Jul 10 2018 1:29AM | Last Updated: Jul 12 2018 10:12AMऔरंगाबाद : विशेष प्रतिनिधी

आफ्रिका खंडातील घाना देश निर्धूर करण्याचे प्रयत्न तेथील सरकारकडून केले जात असून, त्यासाठी औरंगाबादेत बनणारे बायोमास स्टोव्ह मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याची तयारी दाखविण्यात आली आहे. घानातील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे कंत्राटदेखील औरंगाबादच्या उद्योजकाला मिळण्याची चिन्हे आहेत. चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड अ‍ॅग्रिकल्चरच्या (सीएमआयए) शिष्टमंडळाच्या दौर्‍याचे हे फलित समजले जाते.

‘सीएमआयए’च्या 15 जणांच्या शिष्टमंडळाने नुकतीच घाना येथे भेट दिली. असोसिएशन ऑफ घाना इंडस्ट्रीजच्या (एजीआय) पदाधिकार्‍यांशी उद्योग, व्यवसाय संधीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. घानामध्ये व्यवसाय सुरू करून स्वतःबरोबरच त्या देशाची आर्थिक प्रगती करण्यास मोठा वाव असल्याचे ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 

घाना देशात ग्रामीण भागात अजूनही स्वयंपाकासाठी चुलीचा वापर केला जातो. तो बंद करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. औरंगाबादेत बायोमास स्टोव्हची निर्मिती करणार्‍या केतकी कोकीळ यांनी आपल्या उत्पादनाचे प्रात्यक्षिक तेथे सादर केले. त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आगामी काही महिन्यांत औरंगाबादेतील बायोमास स्टोव्हची घानात मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकते, असे भोगले यांनी सांगितले. औरंगाबादप्रमाणेच घानामध्येही कचर्‍याची मोठी समस्या आहे. घानाचा शेजारी देश असणार्‍या कॅमेरूनमध्ये कचरा प्रक्रिया करण्याचे कंत्राट औरंगाबादच्या एम. एल. भाटी यांना मिळाले आहे. याच धर्तीवर घानानेही कंत्राट देण्याची तयारी दर्शविली आहे.