Fri, Jul 19, 2019 17:59होमपेज › Aurangabad › मुलांनी नाकारले; मुलीने सावरले!

मुलांनी नाकारले; मुलीने सावरले!

Published On: Dec 13 2017 11:30AM | Last Updated: Dec 13 2017 11:29AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : रवी माताडे

मुंबईत कोट्यवधीची संपत्ती असलेल्या एका 74 वर्षीय वृद्धेला माता-पिता निर्वाह भत्ता अधिनियमांतर्गत उपविभागीय महसूल अधिकार्‍यांकडे (एसडीएम)  अर्ज करून मुलांकडूननिर्वाह भत्ता  मागवण्याची वेळ आली आहे. अर्धांगवायू झालेल्या या  आईचा सांभाळ आता त्यांची मुलगी करत असून, आजारपण आणि उदरनिर्वाहासाठी वयोवृद्ध आईने मुलांकडून सव्वा कोटी रुपये मिळावेत,
म्हणून दावा ठोकला आहे.

समाजात प्रतिष्ठित म्हणून वावरणार्‍या वृद्धेच्या चारही मुलांचे मुखवटे ‘एसडीएम’ने बजावलेल्या नोटीसने उतरवले आहेत. वंशाच्या दिव्यांसाठी आटापिटा करणार्‍यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी घटना औरंगाबादेत समोर आली आहे. मुंबईतील पवई येथील रहिवासी असलेल्या कविता (काल्पनिक नाव) सध्या औरंगाबादेत मुलीकडे राहतात. त्यांना चार मुले आणि दोन मुली आहेत. कविता यांच्या  पतीचे निधन 2000 साली झाले. या दाम्पत्याच्या नावे ताडदेव आणि अंधेरी येथे दुकान, बोरीवली, ताडदेव  आणि पवई येथे घर, ताडदेव येथे शॉप, अशी मालमत्ता  ती. 2007 मध्ये कविता यांना अर्धांगवायूचा झटका  आला. त्या काळात उपचारासाठी त्यामुलीकडे राहिल्या. काही महिन्यांनी  मुलांनी त्यांना सांभाळण्यास नकारदिला. त्यानंतर त्यांच्या मुलीने त्यांना  औरंगाबादला आणले. तेव्हापासून मुलगीच त्यांचा सांभाळ करत आहे. 

ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियमांतर्गत माझ्या चारही मुलांकडून मला प्रत्येकी 30 लाख रुपये असे एकूण 1 कोटी 20 लाख रुपये मिळवून द्यावेत, अशी मागणी कविता यांनी उपविभागीय अधिकारी (एसडीएम) शशिकांत हदगल  यांच्याकडे केली आहे. 2013 मध्ये चारपैकी तीन मुलांनी आईला मुंबईला नेले. त्यांनी तिला प्रत्येकीचार महिने सांभाळले. नंतर याच मुलांनी तिची फसवणूक करून सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून विकली. ... त्यांच्याजवळील 60-70 तोळे सोनेही विकून टाकले. मुलांनी माझ्या प्रकृतीची काळजी घेतली नाही, वेळेवर औषधोपचार केला नाही. मला शारीरिक व मानसिक त्रास दिला, असे त्या सांगतात.

मुलांना नोटीस

कविता यांच्या मुलीने एसडीएमकडे अर्ज केला होता. पॅरालिसीसमुळे एसडीएम शशिकांत हदगल यांनीकविता यांचा जबाब घेण्यासाठी तहसीलदार सतीश सोनी यांना कोर्ट कमिशन म्हणून नेमून त्यांचा जबाब घेतला. चारही  मुलांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.