Thu, Jul 18, 2019 10:55होमपेज › Aurangabad › छावणीतील ‘गॅस्ट्रो’ची होणार चौकशी

छावणीतील ‘गॅस्ट्रो’ची होणार चौकशी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

छावणी भागात दूषित पाण्यामुळे पसरलेल्या गॅस्ट्रोच्या साथीची चौकशी करून जो दोषी आढळेल त्याच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल 4 डिसेंबर रोजी सादर करण्याचे आदेश चौकशी समितीला देण्यात आले आहेत.

छावणी परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी सकाळी अध्यक्ष ब्रिगेडिअर अनूराग विज यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण बैठक झाली. उपाध्यक्ष संजय गारोल, नगरसेवक किशोर कच्छवाह, मिर्झा रफत बेग, प्रशांत तारगे, शेख हनीफ, प्रतिभा काकस, पद्मश्री जैस्वाल, स्वीकृत सदस्य कर्नल आर. शर्मा, कर्नल अजय लांबा, मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार नायर यांची उपस्थिती होती. सुरुवातीलाच अध्यक्ष विज म्हणाले, हजारो नागरिकांना गॅस्ट्रोची बाधा झाली ही गंभीर बाब आहे. त्यामुळे हा प्रकार कशामुळे झाला याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

त्यावर नगरसेवकांनी दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली. तर रफत बेग यांनी दोषीला नोकरीतून बडतर्फ करा, अशी मागणी केली. मात्र अध्यक्षांनी यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. तसेच या समितीचे अध्यक्ष संजय गारोल हे असतील, तसेच दोन नगरसेवक व दोन स्वीकृत सदस्यांचा समावेश केला. त्याशिवाय या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून 4 डिसेंबरला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. 

दरम्यान, गॅस्ट्रोची साथ आटोक्यात आणण्यासाठी सहकायर्र् करणार्‍यांचे पत्र पाठवून आभार मानणार असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पाईपलाईनचा मुद्दा काही नगरसेवकांनी उपस्थित केला. चाळीस लाख रुपये खर्च होणार असल्याने चर्चा अवश्य करावी लागणार असल्याचे नायर यांनी म्हणताच नगरसेवक संतापले. त्यातच दोन्ही नगरसेविका काकस व जैस्वाल यांनी नवीन पाईपलाईनला विरोध दर्शविला. त्यामुळे आता गॅस्ट्रोचा अहवाल आल्यानंतर हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर रुग्णालय, पार्किंग, मालमत्ता कर, हॉकर झोन आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.