Sat, Aug 24, 2019 21:38होमपेज › Aurangabad › मिटमिट्यात गावकर्‍यांवर रोखली बंदूक

मिटमिट्यात गावकर्‍यांवर रोखली बंदूक

Published On: Mar 05 2018 1:52AM | Last Updated: Mar 05 2018 1:44AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न रविवारी आणखी चिघळला. कचरा डेपोसाठी जागेची पाहणीकरिता प्रशासनाचे एक संयुक्त पथक सकाळी मिटमिटा येथे धडकले. त्याची माहिती मिळताच गावकर्‍यांनी एकत्रित येऊन अधिकार्‍यांना घेराव घातला. याच वेळी अधिकार्‍यांसोबतच्या एका पोलिसाने गावकर्‍यांवर चक्क बंदूक ताणले. त्यामुळे वातावरण आणखीनच तापले, मात्र नंतर अधिकार्‍यांनी सामंजस्याची भूमिका घेत काढता पाय घेतला.

आंदोलकांनी नारेगाव येथील कचरा डेपो बंद केल्यामुळे शहरात गेल्या सतरा दिवसांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आता शासनाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली आहे. या समितीच्या आदेशावरून पर्यायी जागेच्या पाहणीसाठी एक संयुक्त पथक रविवारी सकाळी मिटमिटा येथे दाखल झाले. पथकात महसूल, मनपा, प्रदूषण नियंत्रण मंडळ, भूजल विकास यंत्रणा आदी विभागांच्या अधिकार्‍यांचा समावेश होता. 

पथक आल्याची माहिती मिळताच गावकरी मोठ्या संख्येने गोळा झाले. काहीही झाले तरी शहराचा कचरा येऊ देणार नाही, असे म्हणत गावकर्‍यांनी अधिकार्‍यांना घेराव घातला. काही जणांनी गाड्यांच्या समोर रस्त्यावर दगड-गोटे टाकले. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. त्यातच अधिकार्‍यांसोबतच्या एका पोलिस कर्मचार्‍याने गावकर्‍यांच्या दिशेने बंदूक रोखले. त्यामुळे वातावरण आणखीनच भडकले. गावकर्‍यांनी पुढे येत घाला गोळ्या घाला आम्हाला म्हणत अधिकार्‍यांना आव्हान दिले, मात्र नंतर अधिकार्‍यांनी सामंजस्याची भूमिका घेत पोलिस कर्मचार्‍यांना त्यांची बंदूक गाडीत ठेवायला लावली, तरीही गावकर्‍यांचा विरोध कायम होता. त्यामुळे हे पथक तिथून परतले.

आमदार शिरसाटांची मिटमिट्यास भेट
मिटमिट्यात सकाळी घडलेल्या या प्रकारानंतर आमदार संजय शिरसाट यांनी सायंकाळी गावात जाऊन गावकर्‍यांची भेट घेतली. काहीही झाले तरी गावात कचरा डेपो होऊ देणार नाही, असे आश्‍वासन त्यांनी गावकर्‍यांना दिले. कचरा टाकण्यासाठी पोलिस बळाचा वापर करणे आणि गावकर्‍यांवर बंदूक ताणणे चुकीचे असल्याचेही आमदार शिरसाट म्हणाले.

गांधेली, कांचनवाडीतही पाहणी
विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून संयुक्त पथकाने रविवारी मिटमिट्याबरोबरच कांचनवाडी, चिकलठाणा आणि गांधेली येथील जागांचीही पाहणी केली. कचरा टाकण्यासाठी यातील कोणत्या जागा योग्य आहेत किंवा तेथे कोणत्या अडचणी आहेत, याचा अहवाल हे पथक विभागीय आयुक्तांना सादर करणार आहे.