Sun, Mar 24, 2019 12:29होमपेज › Aurangabad › कचरा झाकण्याची उठाठेव केली कुणी?

कचरा झाकण्याची उठाठेव केली कुणी?

Published On: Jul 08 2018 1:59AM | Last Updated: Jul 08 2018 1:59AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याच्या पूर्वसंध्येला महानगरपालिका प्रशासनाने रस्त्यांच्या कडेला पडलेल्या कचर्‍याच्या ढिगांभोवती जाळ्या लावून आपली अब्रू झाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, या केविलवाण्या प्रयत्नामुळे अब्रू झाकण्याऐवजी अब्रूचे आणखीनच धिंडवडे निघाले. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही या प्रकाराबाबत नाराजी व्यक्‍त केली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी या प्रकरणी हात झटकत कचरा झाकण्याची नसती उठाठेव केली कुणी अन् कुणाच्या आदेशावरून? याच्या चौकशीचे आदेश दिले. 

शहरात गेल्या पाच महिन्यांपासून अभूतपूर्व अशी कचराकोंडी झालेली आहे.ही कोंडी फोडण्यात मनपा प्रशासनाला आतापर्यंत साफ अपयश आले आहे. कोंडीमुळे अख्ख्या शहराचीच कचराकुंडी झालेली आहे. हा गंभीर प्रश्‍न सोडविण्यात मनपा प्रशासन आणि पदाधिकार्‍यांना आतापर्यंत आलेल्या अपयशामुळे शहराची चांगलीच नाचक्‍की होत आहे. दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक गृहविभागाचे आणि मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी औरंगाबाद दौर्‍यावर येणार होते. त्यांच्यासमोर कचर्‍यामुळे आपल्या अब्रूचे धिंडवडे निघू नये, यासाठी मनपा प्रशासनाने दौर्‍याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी रातोरात शहरातील मुख्य रस्त्यांच्या कडेला जेथे जेथे कचरा पडलेला आहे, तेथे बांबू लावून, त्यावर जाळ्या लावून, कचरा दडपण्याचा प्रयत्न केला. 

‘दैनिक पुढारी’ने ही बाब शनिवारच्या अंकात चव्हाट्यावर आणली. राज्य शासनाने ही कोंडी फोडण्यासाठी तब्बल 89 कोटींचा डीपीआर मंजूर केलेला आहे. शिवाय हा प्रश्‍न सुटावा यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य मनपा प्रशासनाला करीत आहे. तरीही मनपाच्या निष्क्रियतेमुळे तो प्रश्‍न सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. मनपा प्रशासनाने कचरा लपविण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आला. तेव्हा भेटण्यासाठी आलेल्या मनपाच्या शिष्टमंडळासमोर त्यांनी नाराजी व्यक्‍त करीत, अशी लपवाछपवी करण्याऐवजी हा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रयत्न करा असा सल्ला दिल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे या प्रकरणातून महापौर नंदकुमार घोडेले यांनीही आपले हात झटकले. ही नसती उठाठेव केली कुणी, हे मलाच माहीत नाही, असे सांगत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आपण दिले असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. महापौरांनी तर या प्रयत्नातून आपले हात झटकले. ते कुणी केले आपल्याला माहीत नाही, असे स्पष्टीकरण घोडेले यांनी दिले. तर घनकचरा व्यवस्थापन विभागानेही आपण असे आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले. वॉर्ड स्तरावरील अधिकार्‍यांनी परस्पर ही उठाठेव केल्याचे त्यांनी म्हटले आहे.