Mon, Aug 26, 2019 02:31होमपेज › Aurangabad › कचर्‍यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ 

कचर्‍यामुळे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ 

Published On: Mar 23 2018 2:15AM | Last Updated: Mar 23 2018 2:15AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कचराकोंडीमुळे शहरातील लहान-मोठ्या व्यावसायिकांना आर्थिक फटका बसत आहे. परिसरातील दुर्गंधी आणि घाणीमुळे या व्यावसायिकांकडे ग्राहक फिरकेनासे झाले आहेत. उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे घोंगावणार्‍या माशा बघूनच ग्राहक माघारी फिरत आहेत. त्यामुळे शहरातील फळे-भाजीपाला विक्रते यांच्यासह हॉटेल, नाश्ता सेंटर्स यांचा निम्मा व्यवसाय घटला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

मागील पस्तीस दिवसांपासून शहराची कचराकोंडी झालेली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी मनपा प्रशासन आणि पदाधिकारी दररोज बैठक आयोजित करून गहन चिंतन करीत आहे. मात्र, यातून कचराकोंडीवर ठोस उपाय अद्यापही सापडलेला नाही. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे  कचराकोंडीमुळे शहरातील अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांचा अर्धा अधिक व्यवसाय घटला आहे. अनेकांच्या दुकानांसमोर, परिसरात कचरा साचला आहे. त्यातून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने ग्राहकही येईनासे झाले आहेत. शहरातील रसवंतीगृहे, हॉटेल, खानावळी, नाश्ता सेंटर्स, ज्यूस विक्रेते, उघड्यावर खाद्यपदार्थ विक्री सेंटर्स यांच्यासह फळविक्रेत्यांना कचराकोंडीचा मोठा फटका बसत आहे. फळे-भाजी विक्रेत्यांसह इतर काही साहित्य विक्रेते रस्त्याच्या कडेला कोपर्‍यात गाडी लावून व्यवसाय करायचे.

काही ठिकाणी रस्ते दुभाजकाच्या मधल्या जागेत भाजी विक्री केली जात होती. आता मात्र, या ठिकाणी कचरा साचल्याने  या छोट्या विक्रेत्यांचा बाजारच उठला असून अनेकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड
कोसळली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या कचर्‍यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे. काही भागात भटकी कुत्री, शेळ्या, डुकरांचाही सुळसुळाट झाला आहे. त्यासोबतच घोंगावणार्‍या माशा आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने परिसरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना याचा मोठा फटका बसत आहे.

Tags : Auranagbad, Aurangabad News, Garbage,  cause, financial hardship, small business, owners,  city