Mon, Aug 19, 2019 11:09होमपेज › Aurangabad › कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा अडसर दूर

कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा अडसर दूर

Published On: Jul 08 2018 1:59AM | Last Updated: Jul 08 2018 1:59AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

निविदा प्रक्रियेचा अवधी जास्त असल्यामुळे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभा राहण्यास विलंब होत आहे. त्यामुळे हा अवधी कमी करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी मनपाच्या वतीने शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी लगेचच ही मागणी मंजूर केली. त्यामुळे आता पालिकेने 15 जुलैपर्यंतच ही संपूर्ण निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने मनपाला 91 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यातून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासह विविध कामे केली जाणार आहेत. त्याकरिता मनपाने निविदा काढल्या आहेत, परंतु या निविदांचा कालावधी जुलैअखेरपर्यंत आहे. दुसरीकडे शहरातील कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस जटिल बनत आहे. त्यामुळे या निविदांचा कालावधी कमी करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. यावेळी महापौरांसोबत स्थायी समिती सभापती राजू वैद्य आणि सभागृह नेता विकास जैन हे देखील होते. मुख्यमंत्र्यांनी निविदेचा कालावधी कमी करण्यास तातडीने मंजुरी दिली. तिथेच उपस्थित असलेल्या मनपा आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांना त्याबाबत सूचनाही दिल्या. त्यामुळे आता या निविदा प्रक्रिया 15 जुलैपर्यंतच पूर्ण करण्यात येतील, असे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.