Sun, Feb 17, 2019 23:22होमपेज › Aurangabad › गंगापूर तालुक्यात मोहिमेचा फज्जा

गंगापूर तालुक्यात मोहिमेचा फज्जा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

गंगापूर : रमाकांत बन्सोड 

मराठवाडा विभागात एकाच दिवशी प्लास्टिक वेचा मोहिम   राबविण्यात आली. मात्र गंगापूर तालुक्यात या मोहिमेचा फज्जा उडाला. प्लास्टिक मुक्‍त करण्यासाठी सोमवार (दि.27 नोव्हें.) रोजी विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या सूचनेनुसार मोहिम राबविण्याचा आदेश मिळाला होता.  

गंगापूर शहरात फक्‍त पंचायत समिती व नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी कचरा गोळा करून तो एकत्र जमा केला. मात्र शहरातील इतर कार्यालये, शाळा महाविद्यालये मात्र या आदेशापासून अनभिज्ञ राहिली. त्यांनी सरळ यास केराची  टोपली दाखविली. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी खुल्ताबाद येथील हजरत खाजा जरजरीबक्ष याच्या उरूसानिमित्त सार्वजनिक सुटी जाहीर केल्याने सर्व शासकीय कार्यालयांना कुलूप लावलेले होते.

एकीकडे संपूर्ण  मराठवाड्यात  शासकीय कार्यालयातील कर्मचारी प्लॅस्टिकचा कचरा गोळा करून तो नष्ट करण्याच्या उपक्रमात सहभागी झालेले असताना गंगापूर मात्र या मोहिमेबाबत  अपवाद ठरले. प्लास्टिकचा संपूर्ण वापर बंद करणे व सध्या अस्तित्वात असलेल्या प्लॅस्टिक कचर्‍याची विल्हेवाट लावणे असे दोन महत्वाचे टप्पे आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ग्रामपंचायती नगरपालिका हद्दीतील व ग्रामपंचायत हद्दीतील उकिरडा बाजारतळ, शाळा, महाविद्यालये, विविध शासकीय संस्था इत्यादी सार्वजनिक ठिकाणी त्याचबरोबर लोकांच्या खासगी जागेमध्ये असलेला प्लास्टिक कचरा गोळा करून विल्हेवाट लावणे आवश्यक आहे,

याकरिता विभागीय आयुक्‍तानी मराठवाड्यातील सर्व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती व नगरपरिषद हद्दीतील खाजगी व सार्वजनिक जागेतील कचरा एकाच दिवशी गोळा करण्यासाठी 27 नोव्हेंबर हा प्लास्टिक वेचा मोहिम दिवस म्हणून निश्‍चित करण्यात आला होता. नगरपरिषद व ग्रामपंचायत क्षेत्रात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक यांच्यासह ग्रामस्थ, महिला बचत गट, शाळा कॉलेजमधील विद्यार्थी, सेवाभावी संस्थांच्या मदतीने ही मोहिम राबवावी, तसेच खासगी जागेतील प्लास्टिक कचरा गोळा करणे याबाबतच्या पूर्वसूचना सर्व नागरिकांना देण्यात याव्यात जे नागरिक खासगी जागेतील प्लास्टिक कचरा गोळा करणार नाहीत अशा नागरिकांवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्‍तांनी आदेशात म्हटले आहे.