Tue, Apr 23, 2019 01:41होमपेज › Aurangabad › गांधेलीचे शेतकरी धडकले ‘एसडीएम’ कार्यालयावर

गांधेलीचे शेतकरी धडकले ‘एसडीएम’ कार्यालयावर

Published On: Feb 01 2018 1:42AM | Last Updated: Feb 01 2018 1:16AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

भूसंपादनाच्या मोबदल्यातील भेदभावामुळे संतप्त झालेल्या गांधेली येथील शेतकरी बुधवारी (दि.31) उपविभागीय महसूल अधिकारी (एसडीएम) कार्यालयावर धडकले. आजारी असल्याचे कारण दाखवून ‘एसडीएम’ शशिकांत हदगल हे दिवसभर कार्यालयात फिरकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीत शेतकर्‍यांनी निवेदन देऊन भेदभाव दूर न झाल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला.

शहरालगतच्या गांधेली गावात सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (न्हाई) सुरू केली आहे. अस्तित्वात नसलेल्या बागतलाव गावचे रहिवासी दाखवून गांधेलीच्या 21 शेतकर्‍यांची एकरी 50 लाख रुपये भाव देऊन बोळवण केली जात आहे, तर त्याच्या शेजारीच असणार्‍या धनदांडग्यांच्या जमिनींना मात्र एकरी दोन ते अडीच कोटींचा भाव दिला जात आहे. ‘गांधेलीत 21 धर्मा पाटील’ या मथळ्याखाली बुधवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध करून दैनिक पुढारीने या विस्थापित शेतकर्‍यांच्या व्यथेस वाचा फोडली होती. गांधेलीच्या अन्यायग्रस्त शेतकर्‍यांनी एकत्र येऊन तातडीने बैठक घेतली. सर्वांनी उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. उपविभागीय अधिकारी हदगल हे आजारी असल्याचे कारण दाखवून कार्यालयात फिरकलेच नाहीत. धनदांडग्या शेतकर्‍यांसारखा मोबदला न मिळाल्यास धर्मा पाटील यांच्याप्रमाणे मंत्रालयात जाऊन टोकाचे पाऊल उचलावे लागेल, असा इशारा या शेतकर्‍यांनी दिला. संतोष चंदनसे, काकासाहेब जगदाळे, नवलसिंग चंदनसे, सुरसिंग चंदनसे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.