वैजापूर : प्रतिनिधी
कपाशीच्या पिकावर अंतिम टप्प्यात बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्यांचे कंबरडे मोडले आहे. दहा दिवसांत बोंडअळीचे पंचनामे करण्याचा फतवा महसूल विभागीय आयुक्तांनी काढल्याने काम उरकण्यासाठी काही महाभागांनी चक्क घोडेस्वारी करून पंचनामे करण्याची क्लृप्ती लढविली, परंतु महसूल विभागाच्या अधिकार्यांनी याबाबत नोटिसा बजावून कृषी सहायक व तलाठ्यांचे कान टोचल्याने ते घोड्यावरून आता जमिनीवर आले आहेत.
तालुक्यातील एकूण 77 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली आहे. शेंदरी बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा आता जीपीएस प्रणालीव्दारे संयुक्तपणे गठीत केलेल्या पथकामार्फत पंचनामे करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले होते. नैसर्गिक आपत्ती असल्याने तालुक्यातील सरसकट बाधीत शेतकर्यांच्या क्षेत्राचे पंचनामे करून दहा दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत बाधीत क्षेत्राचे पंचनामे सुरू करण्यात आले होते, परंतु महसूल विभागाच्या नवीन आदेशामुळे या प्रक्रियेला आता खो बसला होता.
तालुक्यातील शेतकर्यांनी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्या वतीने बाधित क्षेत्राचे जायमोक्यावर जाऊन जीपीएस व व्हिडिओ चित्रीकरणासह पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पथकात तलाठ्यासह कृषी सहायक व ग्रामसेवकाचा समावेश आहे. नवीन आदेशानुसार यापूर्वी शेतकर्यांच्या बाधीत क्षेत्राचे केलेले पंचनामे रद्द करून नव्याने पंचनामे करण्याचे आदेश प्राप्त झाल्याने जुन्या पंचनाम्यांना खो बसला आणि एच नमुन्यात पथकाने पंचनामे करण्यास सुरुवात केली. येत्या 10 दिवसांत पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
दरम्यान, प्रशासन सुरुवातीला केवळ कागदी घोडे नाचविण्यात दंग होते, परंतु पंचनाम्यांची लगीनघाई उरकण्यासाठी काही तलाठी व कृषी सहायकांनी प्रत्यक्षात घोडे नाचविल्याने तालुक्यातील शेतकर्यांसह सामान्यांना आश्चर्याचा धक्का बसला. तालुक्यातील अचलगाव येथील एका शेतकर्याच्या शेतात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे या आश्चर्यकारक कामगिरीमुळे संबंधित तलाठी व कृषी सहायकावर सर्वांनीच राळ उठविली. वरिष्ठांनी त्यांना नोटीसा बजावून खुलासाही मागविला. केवळ शेतकर्याने केलेल्या आग्रहामुळे घोड्यावर बसून नुकसानीचे पंचनामा केल्याचे संबंधित तलाठी व कृषी सहायकाने नोटिसीला दिलेल्या उत्तरात सांगितले. वरिष्ठांनी कान टोचल्याने तलाठी व कृषी सहायक सरळ तर झालेच, परंतु अन्य कर्मचारीही यामुळे जमिनीवर आले आहेत.
दरम्यान, संबंधित तलाठी व कृषी सहायकाने पंचनाम्यादरम्यान घोडेस्वार होऊन लढविलेल्या क्लृप्तीमुळे या बाबीचा तालुक्यात सर्वत्रच हशा झाला. दरम्यानच्या काळात झालेल्या पावसामुळे कपाशीला अंकुर फुटून शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यातच बोंडअळीने कहर केल्याने शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग अस्मानी व सुलतानी संकटात सापडलेला असताना संबधितांनी लुटलेला घोडेस्वारीचा आनंद खेदजनक म्हणावा लागेल, पंचनामे दुचाकीवर जाऊन करतात की घोडेस्वारी करून करतात, हा विषय महत्त्वाचा नसला तरी त्यांनी याही परिस्थितीत घोडेस्वारीचा आनंद लुटला. हा प्रकार जास्त हस्यास्पद ठरल्याने महसूल विभागाबरोबरच कृषी विभागाचे चांगलेच धिंडवडे निघाले आणि तालुक्यातील नागरिकांना आयते चर्वीत चर्वाण मिळाले.