Fri, Sep 20, 2019 04:43होमपेज › Aurangabad › सिडकोतून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास 

सिडकोतून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास 

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:42AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन शांततेत व्हावे, यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात होता. त्यामुळे धिंगाणा घालणारे रस्त्यावर उतरले नाहीत; परंतु यात चोरट्यांनी डल्ला मारला. तब्बल बाराशे पोलिस बंदोबस्तावर असताना सिडको, एन-4 भागात चोरट्यांनी घर फोडून सव्वातीन लाखांचे दागिने लंपास केले. ही घटना 31 डिसेंबरच्या रात्री नऊ ते दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डोलफर्ड हनमिंट मिनेजस (73) हे एन-4 भागात राहतात. रविवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास ते घराला कुलूप लावून थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी बाहेर गेले. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचे कुलूप आणि कडीकोयंडा तोडून कपाटातील तीन लाख 23 हजारांचे दागिने लंपास केले. पहाटे दीड वाजेच्या सुमारास डोलफर्ड घरी आले. त्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. त्यांनी पुंडलिकनगर पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिस त्यांच्या घरी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी डोलफर्ड यांच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, एकीकडे पोलिसांनी नवीन वर्षाचा जल्लोष शांततेत झाल्याचे सांगितले. मात्र, दुसरीकडे चोरट्यांनी पोलिसांना चांगलाच हिसका दाखविला.

31 डिसेंबरच्या रात्री सर्व पोलिस ठाणे, वाहतूक शाखा व विशेष पथकासह जवळपास बाराशे पोलिस बंदोबस्तावर होते. विविध चौकांत वाहनचालकांची तपासणी सुरू होती. यात पोलिसांनी 116 ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या केसेस केल्या. याशिवाय 299 वाहनचालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून अंदाजे पाच लाख रुपये दंड वसूल केला, अशी माहिती वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्‍त सी. डी. शेवगण यांनी दिली. 

31 डिसेंबरच्या रात्री स्वतः पोलिस आयुक्‍त यशस्वी यादव हे रस्त्यावर फिरत होते. त्यांनी विविध चौकांत पोलिसांच्या तपासणीचा आढावा घेतला. दरम्यान, हर्सूल भागात एका पोलिस अधिकार्‍याला दिलेल्या ब्रेथ अ‍ॅनालायझर मशीनचा वापरच झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यावर आयुक्‍तांनी चक्‍क या मशीनचा पहिला वापर पोलिस अधिकार्‍यावरच केला. तसेच, यानंतर अशी चूक न करण्याची तंबी दिली.WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex