Wed, Apr 24, 2019 11:57होमपेज › Aurangabad › विद्यापीठ कर्मचार्‍यांना निशुल्क उच्च शिक्षण  

विद्यापीठ कर्मचार्‍यांना निशुल्क उच्च शिक्षण  

Published On: Jan 14 2018 1:51AM | Last Updated: Jan 14 2018 12:13AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आपल्या कर्मचार्‍यांना निशुक्‍ल उच्च शिक्षण देणार आहे. व्यवस्थापन परिषदेच्या शनिवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती कुलसचिव डॉ. साधना पांडे यांनी दिली. कर्मचार्‍यांना उच्च शिक्षणासह पीएच.डी. साठीही शुल्क लागणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नव्या सात महाविद्यालयांचे प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यास मंजुरी देण्यात आली. यात हॉटेल मॅनेजमेंटसह इतर अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांचा समावेश आहे. विद्यापीठात शिक्षकेतर कर्मचार्‍यांची संख्या मोठी आहे. पदोन्नती तसेच ज्ञानवृद्धीसाठी काही कर्मचार्‍यांना शिकण्याची इच्छा असते. तथापि, पैशांमुळे ते शिकत नाहीत. त्यामुळे अधिकाधिक कर्मचार्‍यांना उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने त्यांना निशुल्क उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यापीठातील गतिरोधक हटविण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली. विद्यापीठ निधीतून नियुक्त करण्यात आलेल्या वाहनचालकांना वेतनश्रेणी देण्याचा प्रस्ताव होता. तथापि, त्यावर निर्णय होऊ शकला नाही.  महिनाभरात विद्यापीठ अधिकारमंडळ पूर्णांशाने अस्तित्वात येईल. त्यामुळे धोरणात्मक निर्णय पुढील बैठकीत ठेवावेत, असे बहुतांश सदस्यांचे म्हणणे होते. त्यामुळे वाहनचालकांना वेतनश्रेणी देण्याच्या प्रस्तावासह इतर अनेक प्रस्ताव पुढील बैठकीत ठेवण्याचे ठरले. बैठकीला डॉ. पांडे, वित्त व लेखा अधिकारी डॉ. नंदकुमार राठी, परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके आदी उपस्थित होते.