Tue, Apr 23, 2019 23:34होमपेज › Aurangabad › ‘बहन, बहन ना रही!’ 

‘बहन, बहन ना रही!’ 

Published On: May 25 2018 1:07AM | Last Updated: May 25 2018 12:35AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

‘भाई, भाई ना रहा’ अशी म्हण प्रचलित आहे, पण येथे ‘बहन, बहन ना रही’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. एका महिलेने बहिणीच्या खोट्या सह्या करून त्यांच्या नावावर असलेले घर तारण ठेवले. त्याआधारे बँकेतून तब्बल 92 लाख 95 हजार 673 रुपयांचे कर्ज काढले. याबाबत विचारले तर शिवीगाळ करून ठार मारण्याच्या धमक्या देत आहे. या प्रकरणी वेदांतनगर ठाण्यात बहिणीसह बँकेच्या अधिकार्‍यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

जयश्री नवनाथ सोमासे (45, रा. बजाजनगर, एमआयडीसी, वाळूज, कोलगेट कंपनीजवळ, जयभवानी चौक) असे आरोपी महिलेचे नाव आहे. ती व्यापार करते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आशाबाई चंद्रकांत निमसे (60, रा. कासलीवाल तारांगण, मिटमिटा) यांनी फिर्याद दिली. आशाबाई आणि जयश्री या दोघी बहिणी आहेत. त्यांनी 1999 मध्ये एमआयडीसीकडून प्लॉट नं. आरएल 137, ब्लॉक दुसरा हा चार हजार सातशे स्क्‍वेअर फुटांचा प्लॉट खरेदी केला होता. त्यापैकी दोन हजार 350 स्क्‍वेअर फूट प्लॉट आशाबाई यांच्या नावावर आहे. मात्र, या प्लॉटची रजिस्ट्री आरोपी जयश्री सोमासे हिच्याकडे आहे. दरम्यान, आपल्या हिश्श्याच्या प्लॉटवर आशाबाई यांनी एमआयडीसीकडून परवानगी घेऊन दोन मजली बांधकाम केले. त्यानंतर नमूद जागेची परत 10 जानेवारी 2006 मध्ये रजिस्ट्री केली. 3 सप्टेंबर 2017 रोजी आशाबाई या अदालत रोडवरील देना बँकेत गेल्या. तेथे व्यवस्थापक सिन्हा यांनी त्यांना तुमच्या घरावर कर्ज असल्याचे सांगितले. अधिक खात्री केली असता आशाबाई यांची बहीण जयश्री सोमासे हिने कोणतीही पूर्वपरवानगी न घेता परस्पर खोट्या सह्या करून तब्बल 92 लाख 95 हजार 673 रुपयांचे कर्ज काढल्याचे समोर आले. 

बँकेच्या अधिकार्‍यांशी हातमिळवणी

माझी बहीण जयश्री सोमासे हिने बँक अधिकार्‍यांना हाताशी धरून एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले आहे. त्यामुळे या प्रकरणात एकटी जयश्री सोमासे ही आरोपी नसून बँक अधिकार्‍यांचाही त्यात सहभाग असल्याची शक्यता आशाबाई निमसे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीकांत नवले करीत आहेत.