Thu, Jul 18, 2019 02:14होमपेज › Aurangabad › विदेशी पर्यटकांनी फिरविली ऐतिहासिक शहराकडे पाठ 

विदेशी पर्यटकांनी फिरविली ऐतिहासिक शहराकडे पाठ 

Published On: Sep 07 2018 12:58AM | Last Updated: Sep 07 2018 12:58AMऔरंगाबाद : बाबासाहेब बोकील 

पर्यटननगरी म्हणून औरंगाबादची देशभरात ओळख आहे. एकेकाळी शहरातील रस्त्या-रस्त्यांवर भारतीय पर्यटकांबरोबरच विदेशी पर्यटकांची गर्दी दिसत असे, परंतु दोन वर्षांपासून शहरात येणार्‍या विदेशी पर्यटकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे एमटीडीसी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून समोर आले आहे.  

औरंगाबाद जिल्ह्यात देशभरातून पर्यटक दाखल होतात. शहरातील बीबी का मकबरा, पाणचक्‍की, तसेच वेरूळ येथील लेणी, दौलताबादचा किल्ला, औरंगाबाद लेणी, अजिंठा लेणी आदी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी विदेशातील पर्यटक जिल्ह्यात दाखल होतात. मात्र, दोन वर्षांपासून विदेशातून येणार्‍या पर्यटकांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये 74 हजार 67 विदेशी पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले होते. एप्रिल 2016 ते मार्च 2017 या कालावधीत 65 हजार 937 विदेशी पर्यटकांनी जिल्ह्यात हजेरी लावली होती. एप्रिल 2017 ते जून 2018 शहरात 23 हजार 946 पर्यटकांनीच हजेरी लावली आहे. प्रशासनाकडून पर्यटनस्थळांचा योग्य प्रचार व प्रसार होत नसल्याने विदेशी पर्यटकांची संख्या घटत आहे.

प्रत्येक महिन्यात घटतीय संख्या 

जानेवारी 2018 पासून अर्थात आठ महिन्यांच्या आकडेवारीनुसार औरंगाबादमधील पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी विदेशी पर्यटकांबरोबर, देशातील पर्यटकांनीसुद्धा पाठ फिरविली आहे. एमटीडीसीने दिलेल्या आकडेवारीवरून ही दाहकता दिसून आली. अशीच परिस्थिती राहिली, तर औरंगाबाद पर्यटन नगरीला घरघर लागेल. 

सुरक्षितता नाही : पर्यटकांमध्ये भीती  औरंगाबाद जसे पर्यटनाची नगरी म्हणून ओळखली जाते. तशीच विविध चळवळींचे केंद्रस्थान म्हणूनही शहराची ओळख आहे. जानेवारीमध्ये भीमा-कोरेगाव, मराठा समाज आरक्षण आंदोलन, शहरात झालेल्या दंगलीच्या घटनांमुळे शहरात सुरक्षितता राहिली नाही. कधी जीविताला धोका निर्माण होईल, या भीतीपोटीच पर्यटकांची संख्या घटल्याचे एमटीडीसी अधिकार्‍यांनी सांगितले.