Sun, Mar 24, 2019 12:28होमपेज › Aurangabad › मराठवाड्यात ठिय्या आंदोलन

मराठवाड्यात ठिय्या आंदोलन

Published On: Aug 02 2018 1:57AM | Last Updated: Aug 02 2018 12:55AMऔरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने बुधवारी मराठवाड्यात लोकप्रतिनिधींच्या घरांसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. लातूर येथे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर पोलिस आणि आंदोलकांत झटापट झाली. औरंगाबाद जिल्ह्यात कायगाव येथे जलसमाधी घेणार्‍या काकासाहेब शिंदे यांच्या दहाव्याचा कार्यक्रम झाला. यावेळी कायगाव पुलाला काकासाहेब शिंदे यांचे नाव देण्यात आले.दरम्यान, मराठवाड्यात आंदोलनाची धग कायम असली तरी, कुठेही हिंसक प्रकार घडला नाही. किरकोळ प्रकार वगळता शांतता होती, असे पोलिसांनी सांगितले.

लातुरात ठिय्या

पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलनासाठी जाणार्‍या मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्यांना रोखल्याने संतप्‍त आंदोलकांनी बॅरिकेट पाडून थेट पालकमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटापटही झाली. पालकमंत्री पाटील हे मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य असून त्यांनी कधी मराठा आरक्षणावर गंभीरपणे चर्चा केली नाही. हा विषय निकालात निघावा म्हणून खंबीर भूमिकाही घेतली नाही. आरक्षणच हाच पर्याय असून ते मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही आंदोलकांनी यावेळी ठणकावले.पालकमंत्री बुधवारी शहरात असल्याने ते आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतील अशी अपेक्षा होती मात्र ते आंदोलनस्थळी न फिरकल्याने आंदोलकांनी त्यांचा निषेध केला.

कुंभेफळ येथे रास्ता रोको

उस्मानाबाद ः परंडा तालुक्यातील कुंभेफळ येथे सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी दि. 1 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आरक्षणासह समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा दि. 6 ऑगस्ट रोजी पुन्हा रास्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात अ‍ॅड. गोविंद कोटुुळे, सोमनाथ कोटुळे, सुनील गटने, प्रदिप कोटुळे, मल्हारी जाधव, उमेश कोटुळे, चांगदेव नलवडे, संभाजी बोराडे, अलीम बेग, किशोर गायकवाड, शाहू बोराडे, देवानंद कोटुळे, बाबासाहेब अडगळे आदींची उपस्थिती होती.