होमपेज › Aurangabad › शंभर दिवसांपासून कचरा पेटलेलाच 

शंभर दिवसांपासून कचरा पेटलेलाच 

Published On: May 26 2018 1:49AM | Last Updated: May 26 2018 12:13AMऔरंगाबाद : राहुल जांगडे

कचराकोडींतून सुटकेसाठी अनेकांनी पहिल्या दिवसापासूनच कचर्‍याला ‘काडी’ लावण्याचा शॉर्टकट शोधून काढला. शहरातील सर्वच भागांत कमी-अधिक प्रमाणात कचरा जाळण्याच्या घटना सुरू झाल्या. अवघ्या महिनाभरात तब्बल सव्वाशे ठिकाणी अग्निशमन बंबाला पेटता कचरा विझविण्यासाठी धावाधाव करावी लागली. ही संख्या आता दोनशेच्या जवळ गेली आहे. मात्र, मोंढा नाका येथील जळता कचरा शंभर दिवसांपासून विझलाच नाही. चोवीस तास हा कचरा जळतोय, कधी आगीचे लोळ तर कधी धुराचे लोट सुरूच आहेत. कचराकोंडीच्या नाबाद शतकासोबतच या ‘जळत्या’ कचर्‍यानेही शंभरी गाठली आहे.

नारेगाव वासीयांच्या प्रचंड विरोधानंतर 16 फेबु्रवारी रोजी तेथील कचरा डेपो बंद झाला. तेव्हापासून झालेली शहराची कचराकोंडी आज शंभर दिवसांनंतरही कायम आहे. या शंभर दिवसांदरम्यान शहरात अनेक घडामोडी झाल्या. उलथा-पालथ झाली. मात्र, तरीही कचराकोंडी काही सुटलेली नाही. कचराकोंडीनंतर पहिल्या दिवसापासून अनेकांनी ठिकठिकाणी कचरा जाळला. मनपाचे कर्मचारीही कचरा जाळताना आढळले. एका कर्मचार्‍यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र, प्रशासनातील काही अधिकारीच कचरा जाळण्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप मध्यंतरी कामगार संघटनांनी केला. तरीही कचरा जाळण्याचे प्रकार काही थांबले नाहीत. अद्यापही शहरात ठिकठिकाणी कचर्‍याला आग लावण्याचे प्रकार सुरूच आहेत. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तब्बल सव्वाशेपेक्षा जास्त ठिकाणी जळणारा कचरा विझविण्यासाठी अग्निशमन बंबाची मदत घ्यावी लागली. मात्र, मोंढा नाक्यावरील कचरा कचराकोंडीच्या पहिल्या दिवसापासून पेेटलेला आहे. शंभर दिवसांमध्ये हा कचरा कधीच विझला नाही. कधी आगीचे लोळ तर कधी धुराचे लोट यातून चोवीस तास सुरूच आहेत. परिसरातील दुकानदार दररोज निघणारा कचरा याच ठिकाणी टाकतात. त्यामुळे ही आग कमी-अधिक प्रमाणात धुमसतच आहे.

शहरातील कचरा उचलून नियोजित ठिकाणी नेला जात आहे. या कचर्‍याची त्या ठिकाणी शास्त्रोक्‍त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत असल्याचे मनपाकडून सांगण्यात येत आहे. वास्तविक फायरच्या वतीने मिळालेल्या माहितीनुसार कचराकोंडीच्या शंभर दिवसांत तब्बल 231 वेळा पेटता कचरा विझविण्यासाठी फायरच्या बंबांना धावाधाव करावी लागली. शहरातील पैठणगेट, औरंगपुरा, शहागंज, घाटी परिसर, मध्यवर्ती बसस्थानक, क्रांती चौक, कोकणवाडी, पदमपुरा, रेल्वेस्टेशन, काल्डा कॉर्नर, शहानूरवाडी, गांधीनगर, उल्कानगरी आदी भागांसह पुंडलिकनगर, बीड बायपास, चिकलठाणा, शेणपुंजी आणि नारेगाव कचरा डेपो अशा सर्वच भागांत अग्निशमन विभागाला आग विझविण्यासाठी जावे लागल्याने त्यावरून कचरा विल्हेवाटीचे जळीत‘कांड’ सुरू आहे, हे स्पष्ट होते.