Tue, Jul 23, 2019 04:03होमपेज › Aurangabad › क्रौर्य; खून करून भरले पोटात दगड

क्रौर्य; खून करून भरले पोटात दगड

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 22 2018 12:43AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

गेल्या 16 मेपासून बेपत्ता असलेल्या 30 वर्षीय प्लंबरच्या खुनाचे गूढ उकलण्यात बेगमपुरा पोलिसांना यश आले असून पाच जणांनी अपहरण करून 28 वार करीत त्याचे पोट फाडले. सर्व आतडी बाहेर काढून त्यात दगड भरले. तसेच गुप्तांग कापून नंतर मृतदेह विहिरीत फेकला. अतिशय निर्घृणपणे हत्या केल्यानंतर आरोपीनेच बेगमपुर्‍यातील फौजदाराला फोन करून खुनाची कबुली देत मृतदेह दौलताबादच्या विहिरीत शोधा, असे सांगितले. या प्रकरणी सोमवारी (दि. 21) बेगमपुरा पोलिसांनी दोघांना अटक केली. 

महंमद अलीमोद्दीन ऊर्फ अलीम मिनाजोद्दीन अन्सारी (45, रा. हिलाल कॉलनी) आणि शेख इरफान ऊर्फ बाबा लोली शेख करीम (22, रा. आसेफिया कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे असून अपहरणप्रकरणी न्यायालयाने त्यांना 23 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, बेगमपुरा भागातील प्लंबर शेख जब्बार शेख गफ्फार (30) हा 16 मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीवरून (एमएच-20-2416) घराबाहेर पडला होता. त्याचे पांढर्‍या कारमध्ये आलेल्या महंमद अलीमोद्दीन, बाबा लोली, शेख अमजद शेख असद तसेच दोन खुनाचे गुन्हे दाखल असलेल्या शेख वाजेद ऊर्फ बबला शेख असद आणि सिकंदर (रा. गुलाबवाडी) यांनी खाम नदीजवळील घोड्याच्या तबेल्यापासून अपहरण केले होते. याबाबत त्याचा भाऊ शेख सत्तार याने तक्रार दिली होती. त्याचा शोध घेत असतानाच रविवारी रात्री बेगमपुरा ठाण्यातील फौजदार राहुल रोडे यांना बबलाने फोन करत आपणच त्याचा खून केला आहे. त्याचा मृतदेह दौलताबादेतील एका विहिरीत फेकल्याची माहिती दिली होती. त्यामुळे बेगमपुरा ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल रोडे यांनी दौलताबादला धाव घेतली. याचदरम्यान, दौलताबाद पोलिसांना विहिरीत एक मृतदेह आढळल्याचे कळाले. तसेच तेथे अग्निशमन दलाचे जवान देखील पोहोचले होते. यानंतर उपनिरीक्षक रोडे यांच्यासह साथीदारांनी शेख जब्बार याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत आणला. 
‘म्हस’मुळे पटली ओळख
मृत शेख जब्बारच्या कानाच्या पाठीमागे एक ‘म्हस’ होती. त्यावरून नातेवाइकांना त्याची ओळख पटली. दरम्यान, घाटीत आणल्यानंतर जब्बारच्या पोट, छातीवर तब्बल 28 वार केल्याचे समजले. तसेच, आतडे बाहेर काढून पोटात दगड भरले होते. त्याचे गुप्तांगदेखील कापले होते. 
पाचवर गुन्हा, तिघे पसार 
या घटनेनंतर पोलिसांनी अपहरणाच्या तक्रारीत नमूद असलेल्या महंमद अलीमोद्दीन व बाबा लोलीला अटक केली. खुनात पाच आरोपींचा समावेश असून उर्वरित बबला, शेख अमजद व सिकंदर हे पसार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. मात्र, नेमका वाद कोणत्या प्लॉटवरून झाला?, जब्बारची हत्या कुठे करण्यात आली? याचा पोलिस शोध घेत आहेत. 
अनैतिक संबंधाची किनार
आरोपी बबला आणि एक टॅक्सीचालक शेजारी राहायचे. मृत अधून-मधून बबलाकडे जायचा. तेथेच त्याचे टॅक्सीचालकाच्या पत्नीशी अनैतिक संबंध जुळले. ही बाब टॅक्सीचालकाला माहीत झाल्यावर त्याने बबलाला अडीच लाखांची सुपारी देऊन जब्बारचा काटा काढला, अशीही चर्चा आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी टॅक्सीचालकाची चौकशी केली. मात्र, उशिरापर्यंत फारशी माहिती मिळू शकली नाही. मात्र, आरोपींची क्रूरता पाहून अनैतिक संबंधाचीही किनार असण्याची शक्यता नाकारता येत नाही.