होमपेज › Aurangabad › दोन दिवसांत पूर्ण कचरा उचलणार : डॉ. भापकर

दोन दिवसांत पूर्ण कचरा उचलणार : डॉ. भापकर

Published On: Mar 13 2018 1:47AM | Last Updated: Mar 13 2018 1:44AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

शहरातील नऊ झोनमध्ये काही दिवसांपासून विविध ठिकाणी सुमारे तीन हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. हा कचरा येत्या दोन दिवसांत उचलण्यात येईल. तसेच कचर्‍याचे ओला-सुका वर्गीकरण व विकेंद्रीकरण करण्याचे कामही सुरू झाले असून, ज्या त्या वॉर्डाचा कचरा तिथेच जिरवून कंपोस्टिंग करण्यावर भर दिला जात असल्याची माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सोमवारी दिली.

सोमवारी विभागीय आयुक्‍तालयात डॉ. भापकर यांनी विविध विभागांच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. त्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन, मनपा आयुक्‍त डी. एम. मुगळीकर, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्यासह मनपातील अधिकारी-पदाधिकार्‍यांसोबतही चर्चा केली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांनी दिलेल्या पंचसूत्रीनुसार शहरातील नऊपैकी अनेक विभागांत सुरू झालेल्या कार्यवाहीचा आढावा त्यांनी या बैठकांमध्ये घेतला. 

डॉ. भापकर म्हणाले की, सर्व विभागीय, जिल्हास्तरीय, सरकारी कार्यालयातील व कार्यालयाच्या परिसरातील कचर्‍याचे वर्गीकरण करून ओल्या कचर्‍याचे कंपोस्ट खत कसे करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक अधिकारी, कर्मचार्‍यांनी घरातील कचर्‍याचे ओला व सुका असे वर्गीकरण करूनच मनपाच्या सफाई कर्मचार्‍यांना द्यावा. जेणेकरून ओल्या कचर्‍यावर योग्य प्रक्रिया करून कंपोस्ट खत तयार करता येईल. सुक्या कचर्‍यावर योग्य प्रक्रिया करून पुनर्वापर करता येईल. शहरातील 9 झोनमधील अधिकार्‍यांच्या मदतीसाठी जिल्हास्तरीय अनुभवी अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात येणार असून औरंगाबाद विभागात पाच लाख युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे.