Sun, May 19, 2019 21:59होमपेज › Aurangabad › बिबट्याच्या हल्ल्यात पाच जखमी 

बिबट्याच्या हल्ल्यात पाच जखमी 

Published On: Jun 29 2018 1:03AM | Last Updated: Jun 29 2018 12:59AMवैजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील शिवराई शिवरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून बिबट्याच्या हल्ल्यात पाचजण जखमी झाले आहेत. यातील दोघे गंभीर जखमी आहेत. ही घटना 28 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास घडली, दरम्यान, पाच जणांपैकी तिघांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत बिबट्याचा शोध लागला नसल्याने परिसरातील गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सोन्याबापू बोर्डे (29), जालिंदर आहदे (40), प्रवीण डांगे (25), धनंजय डांगे व आकाश बोर्डे (16, सर्व रा. शिवराई) असे हल्ल्यात जखमी झालेल्यांची नावे आहेत. यातील सोन्याबापू बोर्डे व जालिंदर आहदे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील शिवराई येथील संभाजी डांगे यांचे शिवराई-कनकसागज रस्त्यावर शेत असून गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांना प्रथम बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे ते घाबरले व ही माहिती त्यांनी आसपासच्या शेतकर्‍यांना सांगितली. यानंतर डांगे यांच्या शेताभोवती नागरिकांनी गर्दी केली.

याच गर्दीतून जालिंदर आहदे व सोन्याबापू बोर्डे हे दोघे बिबट्याचा शोध घेण्यासाठी हातात काठी घेऊन पुढे सरसावले होते. तेव्हा बिबट्या पाचटामध्ये लपला होता. या दोघांनाही बिबट्याचा अंदाज न आल्याने बिबट्याने प्रथम त्यांच्यावर झडप घालून हल्‍ला केला. त्यांच्यापाठोपाठ बिबट्याने एकामागोमाग तिघांवर झडप घालून हल्‍ले चढविले. या घटनेत पाचजण जखमी झाले. घटनेनंतर यातील तिघांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील प्रवीण डांगे, जालिंदर आहदे व सोन्याबापू बोर्डे हे तिघे जास्त जखमी झाल्याने त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे, दरम्यान बिबट्याचे शिवराई शिवारात आगमन झाल्याची माहिती गावकर्‍यांनी प्रथम वैजापूर पोलिस ठाण्यात कळविली. त्यानंतर वैजापूर पोलिस व गावकर्‍यांनी ही माहिती वनविभागाच्या अधिकार्‍यांना दिली. त्यानुसार पोलिसांसह वनविभाग व महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.