Mon, May 20, 2019 20:56होमपेज › Aurangabad › अजय एजन्सीला आग;  कामगार होरपळला

अजय एजन्सीला आग;  कामगार होरपळला

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:40AMवाळूज महानगर : प्रतिनिधी

वाळूज औद्योगिक क्षेत्रात गुरुवारी अजय एजन्सी या कंपनीला लागलेल्या आगीत एका वृद्धाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज दुसर्‍या दिवशीही बी सेक्टरमधील एका कंपनीला लागलेल्या आगीमुळे एक कामगार भाजून जखमी झाला. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही. 

या विषयी अधिक माहिती अशी की, अभय चंपालाल फिरोदिया यांची वाळूज येथील प्लॉट नंबर बी-67/2 मध्ये अभय एजन्सी या नावाने कंपनी असून या कंपनीतून फर्न्युस ऑईलचे इतरत्र वितरित केले जाते. शुक्रवारी कंपनीला सुटी होती, तर खंडू गवळी व मोहन मुंढे हे दोघे कामगार कंपनीत होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कंपनीच्या मागच्या बाजूने आग लागल्याचे समजताच या कामगारांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण करून कंपनीच्या आवारात असलेल्या ऑईलच्या हजारो लिटर क्षमता असलेल्या दोन टँकला विळखा घातल्याने टँकमधील ऑईलने पेट घेतला. यामुळे भडका उडाल्याने लांबपर्यंत आगीचे लोळ दिसून येत होते. आग विझविण्याच्या प्रयत्नात मोहन मुंढे हा कामगार भाजून जखमी झाला. त्यास उपचारासाठी शहरातील एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, आगीची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे दोन व बजाज कंपनीचा एक अशा तीन बंबांच्या साहाय्याने तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. यासाठी अग्निशामक अधिकारी के. ए. डोंगरे, आर. एस. फुलारे, एस. आर. गायकवाड, ए. ए. चौधरी, बी. एन. राठोड, आर. ए. चौधरी, पी. एम. कोलते, सी. आर. राठोड, ए. जे. गोसावी आदींनी परिश्रम घेतले. कंपनीच्या इमारतीवर कुठल्याही प्रकारचा बोर्ड नसल्यामुळे कंपनी मालकास कंपनीचे नाव आदी माहिती विचारली असता त्यांनी माहिती देण्यास टाळले.