Wed, Jan 16, 2019 20:41होमपेज › Aurangabad › पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृह खाक

पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृह खाक

Published On: Aug 27 2018 1:26AM | Last Updated: Aug 27 2018 1:16AMऔरंगाबाद : प्रतिनिधी 

ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातील तीन वर्षांपूर्वी बांधलेले अद्ययावत असलेले  सभागृह शॉर्टसर्किटच्या आगीत रविवारी (दि. 26) भस्मसात झाले. या आगीत सभागृहातील इलेक्ट्रिक साहित्य व फर्निचर असे सुमारे दहा ते बारा लाख रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली. 

टीव्ही सेंटर परिसरात ग्रामीण पोलिस अधीक्षक यांचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर असलेल्या सभागृहातून पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास अचानक धूर बाहेर पडत होता. ही बाब रात्रपाळी करणार्‍या नियंत्रण कक्षातील फौजदार राजेंद्र सावंत, सहायक फौजदार एस. के. भुजंग, कर्मचारी विश्‍वजित शर्मा यांच्या लक्षात आली. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. सिडको विभागाच्या कर्मचार्‍यांनी तत्काळ धाव घेत ही आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत हे सभागृह जळून खाक झाले. वातानुकूलित यंत्रणा, साउंड सिस्टम, फर्निचर, पंखे, लाईट, संगणक, प्रोजेक्टर, वायरिंग जळून खाक झाले.

सभागृहास आग लागली असल्याचे समजताच कार्यालयात नाईट ड्युटीवर असलेल्या इतर कर्मचार्‍यांची तारांबळ उडाली होती. वायरलेस विभागातील कर्मचारी सुनील सांगळे, रमेश साळवे, ज्ञानेश्‍वर वाहुळ, सुनील वाहुळ हे एका खोलीत झोपलेले होते. त्यांना इतर कर्मचार्‍यांनी दरवाजा वाजवूून उठविले. आगीमुळे घाबरलेल्या कर्मचार्‍यांनी कार्यालयाबाहेर धाव घेतली. सभागृहास आग लागल्याचे कळताच पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, अतिरिक्त अधीक्षक उज्ज्वला वनकर, होम डीवायएसपी सोमनाथ मालकर, सिडको पोलिस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.