Wed, May 22, 2019 16:43होमपेज › Aurangabad › महाराष्ट्र पाणीदार होईपर्यंत चळवळ थांबणार नाही

महाराष्ट्र पाणीदार होईपर्यंत चळवळ थांबणार नाही

Published On: May 03 2018 1:28AM | Last Updated: May 03 2018 12:46AMऔरंगाबाद :

महाराष्ट्राला पाणीदार बनविण्याचे स्वप्न उराशी बाळगून पाणी फाउंडेशन ही संस्था जलसंधारणाचे काम करतेय. लोकांसाठी लोकांच्या माध्यमातून सुरू असलेली ही चळवळ महाराष्ट्र पाणीदार होईपर्यंत थांबणार नाही, असा निर्धार प्रसिद्ध चित्रपट अभिनेता आमिर खान याने बुधवारी (दि. दोन) शहरात आयोजित एका हॉटेलमधील पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्‍त केला. भूजलस्तर वाढविणे हा आमचा मुख्य उद्देश आहे, असेही तो म्हणाला. 

पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेनिमित्त आमिर सध्या पत्नी आणि पाणी फाउंडेशनच्या संस्थापक किरण राव, सत्यमेव जयतेचे दिग्दर्शक सत्यजित भटकळ यांच्यासह राज्याच्या दौर्‍यावर आहे. या सर्वांनी आज स्पर्धेमध्ये सहभागी जिल्ह्यातील गावांना भेट देऊन ग्रामस्थांचा उत्साह वाढविला. त्यानंतर सायंकाळी येथे आयोजित पत्रपरिषदेत बोलताना आमिरने पाणी फाउंडेशनच्या स्थापनेमागील प्रेरणेपासून आतापर्यंतचे काम आणि भविष्यातील वाटचालीचा आलेख मांडला. 

अशी झाली सुरुवात

पाणी फाउंडेशनची सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा राज्यभर गाजते आहे. स्पर्धेचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी 75 तालुक्यांतील दुष्काळग्रस्त गावे यात सहभागी झाली आहेत. पाणी फाउंडेशन आणि या स्पर्धेची सुरुवात  कशी झाली याचा किस्सा आमिरने सांगितला. तीन वर्षांपूर्वी मी सत्यमेव जयते हा टीव्ही कार्यक्रम केला. त्यात लोकांचे प्रश्‍न मांडून त्यांचा चौफेर आढावा घेत उपाय सुचविले जात. हा कार्यक्रम लोकप्रिय झाला. लोकांचा प्रतिसाद पाहून वाटले की, एखादा प्रश्‍न घेऊन तो तडीस नेईपर्यंत काम केले तर लोकांचा किती प्रतिसाद मिळेल. मग पाणी हा विषय निवडत पाणी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. एखाद्या गावाने जलसंधारण चळवळीत सहभागी व्हायचा निर्णय घेतल्यानंतर त्या गावातील पाच ते सहा जणांना जलसंधारणाचे शास्त्रशुद्ध चार ते पाच दिवस प्रशिक्षण दिले जाते. जलसंधारणाची कामे चुकीच्या पद्धतीने होऊ नये हा त्यामागचा उद्देश असतो.

सरकारशी तुलना नाही

राज्य सरकार जलसंधारणाच्या कामावर मोठा निधी खर्च करते. मात्र, त्यांचे काम कुठे दिसत नाही. तुमचे काम उठून दिसते असे का, या प्रश्‍नावर आमिरने सावध प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, मी अशी तुलना करीत नाही. सरकार काम करत आहे. आम्हीही करतोय. मुख्यमंत्र्यांना जलसंधारणाच्या कामात रस आहे. 

टोपल्याऐवजी दगड पास करणे आवडते - किरण

स्वतः श्रमदान करताना कसे वाटते या प्रश्‍नावर किरण राव म्हणाल्या, मी आणि आमिर ग्रामस्थांसोबत श्रमदान करतो. मला भरलेले टोपले पास (एकाकडून घेऊन दुसर्‍याला देणे) करण्याऐवजी दगड पास करणे आवडते. कारण, ते सोपे आहे. आमिरने आम्हाला कधी खूप थंड तर कधी उष्ण वातावरणात चित्रीकरण करण्याची सवय असल्यामुळे उन्हात काम करताना अडचण वाटत नसल्याचे सांगितले. 

झालेल्या र्‍हासाची वर्ष-दोन वर्षांत भरपाई शक्य नाही - भटकळ

मराठवाड्यात केवळ दोन टक्के वनक्षेत्र उरले आहे. एकेकाळी इथे एवढे घनदाट वन होते की, सूर्याची किरणे पोहोचणेही कठीण होते. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या निसर्गाच्या र्‍हासाची एक-दोन वर्षांच्या प्रयत्नांतून भरपाई होऊ शकणार नाही. त्यासाठी सामुदायिक आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे, असे भटकळ म्हणाले.