Tue, Jul 23, 2019 06:15होमपेज › Aurangabad › संचिका थांबल्या; नगरसेवकांचा संताप

संचिका थांबल्या; नगरसेवकांचा संताप

Published On: Jun 21 2018 1:28AM | Last Updated: Jun 21 2018 12:51AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

तिजोरीत खडखडाट असल्याने मनपा आयुक्‍तांनी तूर्तास प्रत्येक विभागात केवळ दहा लाख रुपयांच्याच मर्यादेत कामांना मान्यता देण्याचे धोरण ठेवले आहे. त्याचे पडसाद आजच्या सर्वसाधारण सभेत उमटले. आयुक्‍तांच्या या धोरणामुळे विकासाला ब्रेक लागल्याचा आरोप नगरसेवक-नगरसेविकांनी केला़  तासभर चाललेल्या चर्चेत सर्वच नगरसेवकांनी सर्व मंजूर कामे झालीच पाहिजेत, अशी मागणी केली. त्यानंतर आयुक्‍तांनी जी कामे आवश्यक आहेत ती नक्की केली जातील, असे जाहीर केले. 

सर्वसाधारण सभेत नगरसेवक अफसर खान यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर माजी महापौर त्र्यंबक तुपे, एमआयएम गटनेते नासेर सिद्दीकी, ज्योती अभंग, गजानन बारवाल, शिल्पाराणी वाडकर आदींनी विकास कामांच्या संचिका तुंबल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्‍त केली. आधीच्या दोन-तीन वर्षांत पुरेशी कामे झाली नाहीत. आता दोन वर्षांत मनपाची सार्वत्रिक निवडणूक आहे, जनतेला विकास कामांचे आश्‍वासन देण्यात आलेले आहे़, परंतु कामेच होत नसतील तर अर्थसंकल्पात तरतूद करून काय फायदा असा सवाल यावेळी अनेक नगरसेवकांनी उपस्थित केला. काहींनी विकास कामांना कात्री लावण्याऐवजी प्रशासनाने उत्पन्न वाढवावे, असा सल्ला दिला. सीताराम सुरे यांनीही कामे होत नसल्याबद्दल प्रशासनावर टीकेची झोड उठविली. नगरसेवक वानखेडे यांनी अधिकारी विशेषाधिकारात पाच-पाच कोटींची कामे करतात, मग आमच्या छोट्या-छोट्या संचिकाच का रोखल्या जातात असा सवाल केला.

गजानन मनगटे यांनीही सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या सर्व संचिका मंजूर व्हायला हव्यात, अशी अपेक्षा व्यक्‍त केली. शेवटी महापौरांच्या सूचनेनुसार आयुक्‍त निपुण विनायक यांनी या प्रकरणी त्यांची बाजू मांडली. ते म्हणाले, संवादाअभावी नगरसेवकांचा गैरसमज झालेला आहे़  काही विभागांसाठी जवळपास सव्वाशे कोटींची तरतूद करावी अशी मागणी मीच महापौरांकडे केली होती. जितका निधी उपलब्ध आहे तितकी विकास कामे मार्गी लागतील़  शहरात समानता ठेवून ही कामे होतील़  ही कामे करताना उत्पन्नवाढीबरोबरच अनावश्यक खर्च टाळण्यावरही भर देण्यात येईल, असे
आयुक्‍तांनी स्पष्ट केले.

आधीचेच आयुक्‍त बरे होते : तुपे

माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी आयुक्‍तांवर थेट हल्ला चढविला. ते म्हणाले, दोन-दोन वर्षे पाठपुरावा करून आता कुठे विकास कामांच्या संचिका अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. आता केवळ दहा लाखांपर्यंतचीच कामे करायची म्हटल्यास ही कामे होणार नाहीत. प्रशासनाचा हा निर्णय चुकीचा आहे. असा निर्णय होणार असेल तर आधीचेच आयुक्‍त बरे होते असे म्हणावे लागेल. 

प्रशासन कामे ठप्प करण्यासाठी आहे का ? : अफसर खान

नगरसेवकांच्या वॉर्डातील कामे महत्त्वाची असतात. ही कामे करण्यासाठी नगरसेवकांवर जनतेचाही दबाव असतो. त्यामुळे ती झाली पाहिजे. या संचिका रोखणे म्हणजे विकास कामे रोखणे आहे. प्रशासन विकास कामे करण्यासाठी आहे की ती ठप्प करण्यासाठी आहे, असा सवाल यावेळी नगरसेवक अफसर खान यांनी केला. 

दर महिन्याला नगरसेविकांची सभा

सर्वसाधारण सभेत नगरसेविकांनी अतिशय आक्रमकपणे त्यांच्या वॉर्डातील तक्रारी मांडल्या. त्यानंतर आयुक्‍तांनी नगरसेविकांच्या वॉर्डातील प्रश्‍न सोडविण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे सांगितले. यापुढे दर महिन्यातील एका दिवशी दोन तास याच सभागृहात केवळ नगरसेविकांची सभा होईल़, त्यात त्यांच्या वॉर्डातील प्रश्‍न ऐकून त्यावर कार्यवाही केली जाईल, असेही आयुक्‍त म्हणाले.