Tue, Mar 19, 2019 05:10होमपेज › Aurangabad › लहान मुलांच्या भांडणातून दोन गट भिडले; एक जखमी, वाहनांचे नुकसान

लहान मुलांच्या भांडणातून दोन गट भिडले; एक जखमी, वाहनांचे नुकसान

Published On: May 22 2018 1:24AM | Last Updated: May 21 2018 11:09PMनगर : प्रतिनिधी

लहान मुलांतील भांडणातून काल (दि. 21) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पंचपीर चावडी येथे दोन गट आपसात भिडले. यावेळी एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. त्यात एक जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने दंगेखोरांची धरपकड सुरू केली. रात्री उशिरापर्यंत 7-8 जणांना ताब्यात घेतल्याचे सूत्रांकडून समजले.

दगडफेकीत रिक्षाचे नुकसान झाले आहे. दगडफेकीची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचपीर चावडी परिसरात मोठा पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. 

याबाबत समजलेली माहिती अशी की, पंचपीर चावडी परिसरात दोन लहान मुलांमध्ये वाद झाले होते. या वादातून दोघांच्या नातेवाईकांची भांडणे झाली. त्याचे रुपांतर दंगलीत झाले व एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दोन्ही गटाने एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू केली. दगडफेक सुरूच होताच परिसरातील व्यावसायिकांनी दुकाने बंद केली. दगडफेकीत एकाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.

दगडफेकीची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिस येताच जमाव पांगला. दगडफेकीत एका रिक्षाची तोडफोड करण्यात आली. या वादानंतर पोलिसांनी तातडीने दंगलेखोरांची धरपकड सुरू केली. काही जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. रात्री उशिरापर्यंत ही मोहीम सुरू होती. रात्री उशिरा दोन्ही गटांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी सांगितले.