Mon, Apr 22, 2019 23:40होमपेज › Aurangabad › रात्री वाहनाला दगड लागला तरी थांबू नका, लूटमारीची भीती!

रात्री वाहनाला दगड लागला तरी थांबू नका, लूटमारीची भीती!

Published On: Mar 15 2018 1:56AM | Last Updated: Mar 15 2018 1:55AMऔरंगाबाद : गणेश खेडकर

रात्री खासगी वाहनातून प्रवास करताना रस्त्यावर अनोळखी व्यक्‍तींनी हात दाखवला, गाडीवर दगड मारला, कोणी रडत उभे असेल किंवा वाहन पंक्‍चर झाल्यासारखे वाटत असले तरी निर्मनुष्य ठिकाणी वाहन थांबवू नका, कारण; यात तुमची लूटमार होऊ शकते, असे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले. 

धुळे-सोलापूर महामार्गावर आडूळजवळ सोमवारी रात्री 10.30 वाजता घडलेल्या लूटमारीत सिद्धलिंग रामलिंग कोरे (रा. बीड) यांचा खून झाला होता. तसेच सव्वा लाखाचा ऐवज दरोडेखोरांनी लंपास केला होता. या प्रकारामुळे रात्रीचा प्रवास किती धोकादायक आहे, हे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिसांनी खबरदारी म्हणून आता महामार्गावर पेट्रोलिंग वाढविली असून महामार्ग पोलिसांनाही दक्ष राहण्याबाबत कळविले आहे. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. सिंह म्हणाल्या की, उन्हाळ्यात दिवसा अनेकांना प्रवासात त्रास होतो. उन्हात प्रवास नको म्हणून काही लोक स्वतःच्या वाहनाने रात्रीचा प्रवास करण्याला पसंती देतात.

परंतु, रात्रीचा प्रवास प्रत्येक वेळी सुखाचा होईल, याची शाश्‍वती नाही. अपघाताशिवाय इतर कोणत्याही कारणामुळे प्रवास तुम्हाला अडचणीचा ठरू शकतो. रस्त्यावर लूटमार करणारे सराईत दरोडेखोर वेगवेगळ्या क्‍लृप्त्या वापरून आपले इप्सित साध्य करू शकतात. त्यामुळे रात्रीचा प्रवास खरंच सुखाचा व्हावा, असे वाटत असेल तर नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.

पोलिसांनी केल्या उपाययोजना

औरंगाबाद जिल्ह्यात धुळे-सोलापूर, नाशिक महामार्ग, अहमदनगर रोड, जळगाव, जालना, पैठण आदी महत्त्वाचे रस्ते आहेत. यावरून रात्रीची वाहने नेहमी सुरू असतात. विशेष म्हणजे, या प्रत्येक महामार्गावर अनेक निर्मनुष्य ठिकाणे आहेत. काही ठिकाणी काळाकुट्ट अंधार असतो. तेथे लूटमारीसारख्या घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व महामार्गावर पेट्रोलिंग वाढविली असून, महामार्ग पोलिसांनाही याबाबत कळविले आहे. काही विशेष पथके नेमून गस्त वाढविली असून रस्त्यावर वाहनचालकांनी एकमेकांच्या मदतीला यावे, असे पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

सुखमय प्रवासासाठी महत्त्वाच्या टिप्स

रात्रीच्या प्रवासात महिलांनी दागिने सोबत ठेवू नयेत. 
जास्तीची रोकड सोबत घेऊ नये. नियोजित ठिकाणी पोहोचल्यावर एटीएम, ऑनलाइन बँकिंग याचा वापर करावा.
अंधाराच्या ठिकाणी अनोळखीने हात दाखवून लिफ्ट मागितली तर धोका आहे, असे समजून गाडी थांबवू नका.
निर्मनुष्य ठिकाणी महिला, मुलगी रडत उभी असेल तर गाडी न थांबविता पोलिसांना कळवा.
वाहनावर दगड मारला तर लगेच गाडी थांबवू नका. कारच्या समोरील काचेवर अंडे फेकले तर त्यावर लगेच पाणी मारू नका.