होमपेज › Aurangabad › पित्याकडे नव्हते मुलाचा मृतदेह नेण्यासाठी पैसे

पित्याकडे नव्हते मुलाचा मृतदेह नेण्यासाठी पैसे

Published On: May 27 2018 1:17AM | Last Updated: May 27 2018 12:30AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

रागाच्या भरात कीटकनाशक प्राशन केलेल्या मुलाचा घाटीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. परिस्थितीने गरीब असलेल्या पित्यावर कमावता मुुलगा गेल्याने दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र, त्याहीपेक्षा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी पैसे नसल्याने ते हतबल झाले. शेवटी समाजसेवी संघटना के. के. गु्रपला ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील देऊगाव कोळ येथील रहिवासी हरिश्‍चंद साखरे यांना एक मुलगा व तीन मुली आहेत. त्यांच्या मुलाचे नाव देवमन असून त्याने पत्नीशी झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात कीटकनाशक प्राशन केले. हलाखीची परिस्थिती असलेल्या वडिलांनी इकडून तिकडून पैसे आणून त्याला तत्काळ जालना येथे भरती केले.

मात्र, देवमनची प्रकृती अत्यंत खालावल्याने डॉक्टरांनी घाटीत नेण्याचे सांगितले. त्यांनी शुक्रवारी (दि.25) रात्री 12 वाजता घाटीत उपचारासाठी अ‍ॅडमिट केले. शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हरिश्‍चंद साखरे यांच्याकडे मुलाचा मृतदेह गावी नेण्यासाठी पैसे नसल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली. खूप वेळ तसेच बसून होते. कोणीतरी त्यांना वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात पाठविले. तेथे असलेेले आरएमओ डॉ. शिवप्रसाद बिरादार यांना त्यांनी अडचण सांगितली. डॉ. बिरादार यांनी तत्काळ के. के. गु्रपचे किशोर वाघमारे यांना बोलावून साखरे यांची अडचण सांगितली. किशोर वाघमारे यांनी संघटनेचे अध्यक्ष हाफीज साहेब यांना कळविले. त्यांनी तत्काळ अ‍ॅम्बुलन्सची व्यवस्था करून दिली.