Mon, Apr 22, 2019 23:43होमपेज › Aurangabad › वीज पंपाचे कनेक्शन कट करण्याच्या मोहिमेमुळे शेतकरी संतप्‍त

वीज पंपाचे कनेक्शन कट करण्याच्या मोहिमेमुळे शेतकरी संतप्‍त

Published On: Dec 16 2017 2:19AM | Last Updated: Dec 16 2017 2:19AM

बुकमार्क करा

गंगापूर : रमाकांत बन्सोड 

कमी पाऊस, कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव यासह खरीप हंगामातील पिकांचे घटलेले उत्पादन यामुळे तालुक्यातील शेतकरी सध्या हैराण झाला असून तो आर्थिक संकटात सापडला आहे. तालुक्यातील 27 हजार कृषी पंपधारक शेतकर्‍यांकडे 2014 पासून विजेची थकबाकी 213 कोटी रुपयांवर पोहोचली आहे, हे खरे असले तरी अशावेळी थकलेल्या वीज बिलापोटी महावितरण कंपनीने वीज पंपाचे कनेक्शन कट करण्याची आखलेली मोहीम अयोग्य असून ती तत्काळ थांबविण्यात यावी, नसता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शेतकर्‍यांनी दिला आहे.       

तालुक्यातील सुमारे 22 हजार हेक्टर क्षेत्रांवर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात 27 हजारांपेक्षा अधिक शेतकर्‍यांना कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात आली आहे. या विजेच्या आधारे शेतकर्‍यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होत आहे. काही शेतकरी न चुकता विजेचे देयक अदा करतात; मात्र बहुतांश शेतकरी विविध कारणांमुळे नियमित वीज देयक अदा करू शकत नाहीत. अशा शेतकर्‍यांकडे असलेली थकबाकी 213 कोटी रुपयांवर गेली आहे.  

शासनाच्या निर्देशानुसार नैसर्गिक आपत्तींचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्यात येणार नसून, शेतकर्‍यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी पंपांच्या थकबाकीची ही आकडेवारी मोठी वाटत असली तरी, ती एका वर्षातील नाही. त्यातच अनेक शेतकरी नियमित वीजबिल भरणा करून वीज वितरणला सहकार्य करीत असल्याने कृषी पंपांच्या जोडणीलाही महावितरणकडून वेग देण्यात येत असल्याचे आकडेवारीहून स्पष्ट होते.

थकबाकी असलेल्या कृषी पंपधारकांसाठी वीज वितरण कंपनीने एक योजना आखली असून या योजनेत तीस हजारांपेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या मूळ रकमेचे पाच समान हप्ते करण्यात आले. तीस हजारांपेक्षा अधिक असलेल्या ग्राहकांना मूळ थकबाकीचे दहा समान हप्त्यात भरणा करावयाचा आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीज बिल नोव्हेंबर 2017 पर्यंत भरून डिसेंबर 2017 पासून मूळ थकबाकीपैकी 20 टक्क्यांचा पहिला हप्ता थकबाकीदार शेतकर्‍यांना भरावा लागेल. त्यानंतर मार्च 2018 मध्ये 20, जून 2018 मध्ये 20, सप्टेंबर 2018 मध्ये 20  आणि डिसेंबर 2018 अखेरीस 20 टक्क्यांसह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे. या योजनेत सहभागी न होणार्‍या कृषी पंप थकबाकीदार शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

चालू स्थितीतील तालुक्यातील 27 हजार वीजपंप ग्राहकांपैकी 23 हजार 200 ग्राहक हे थकबाकीत आहेत. 31 मार्च 2017 पर्यंत त्यांच्याकडे  एकूण थकबाकी 213 कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे मूळ थकबाकी 122 कोटी असून व्याज व दंडाचे 91 कोटी मिसळून तो आकडा 213 कोटी झाला आहे. त्यापैकी 3 हजार 800 कृषी वीज ग्राहकांनी दोन कोटी रुपये वीज बिलाचा भरणा केला आहे. शेतकर्‍यांनी लवकरात लवकर सदर योजनेत सहभागी होऊन वीज बिल भरावे.- दत्तात्रय पुंडे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी