Tue, Jul 07, 2020 20:39होमपेज › Aurangabad › दोन महिन्यांत 155 शेतकरी आत्महत्या

दोन महिन्यांत 155 शेतकरी आत्महत्या

Published On: Mar 07 2018 2:43AM | Last Updated: Mar 07 2018 2:37AMऔरंगाबाद :  प्रतिनिधी

जानेवारी ते 4 मार्च या 63 दिवसांमध्ये मराठवाड्यातील 155 शेतकरी कुटुंबांचा आधार हरपला आहे. कर्जमाफीच्या निर्णयानंतरही मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. चार मार्चपर्यंत 155 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. फेब्रुवारी महिन्यात आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवाळीत शासनाने कर्जमाफीच्या घोषणेची अंमलबजावणी करत, प्रातिनिधिक स्वरूपात शेतकरी दांपत्याचा नवीन कपडे देऊन सत्कार करत कर्ज माफ झाल्याचे प्रमाणपत्र दिले होते. कर्जमाफीच्या निर्णयाचा एक इव्हेंटच शासनाने साजरा केला होता. प्रत्यक्षात कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळवताना शेतकर्‍यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. अद्यापही कर्जमाफीचा तिढा सुटलेला नाही.

त्यातच  दोन महिन्यांत 155 शेतकर्‍यांच्या... 

बोंडअळीने अख्खा कापूस फस्त केल्याने शेतकर्‍यांच्या डोक्यावरील कर्जाचा बोजा पुन्हा वाढला. कापूस विक्रीतून भरघोस उत्पन्न मिळण्याच्या अपेक्षा फोल ठरल्या. बोंडअळीच्या नुकसानाचे पंचनामे झाले, मात्र प्रत्यक्षात मदत शेतकर्‍यांपर्यंत पोहोचली नाही. शेतकरी या धक्क्यातून सावरत नाहीत तोच गारपिटीच्या तडाख्यात शेतकरी कोलमडून गेला. परिणामी, शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत. 
2017 या वर्षात मराठवाड्यात 991 शेतकरी आत्महत्यांची नोंद झालेली आहे. कर्जमाफीच्या निर्णयामुळे नव्या वर्षात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांना ब्रेक लागेल, असे अंदाज वर्तवले जात होते. मात्र निकषाच्या आधारावरील कर्जमाफी शेतकरी आत्महत्या थांबवू शकली नाही. 28 जानेवारीपर्यंत 56 शेतकरी आत्महत्या झाल्या तर 4 मार्चपर्यंत शेतकरी आत्महत्येचा आकडा 155 पर्यंत पोहोचला आहे.