होमपेज › Aurangabad › आयुक्‍तालयात शेतकऱ्याच्या दहाव्याचा विधी करणार 

आयुक्‍तालयात शेतकऱ्याच्या दहाव्याचा विधी करणार 

Published On: Feb 23 2018 10:10AM | Last Updated: Feb 23 2018 10:10AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर बँकेत खेट्या मारूनही कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, त्यामुळे त्रस्त झालेल्या पैठण तालुक्यातील टेकडीतांडा येथील कृष्णा मोहन पवार या शेतकर्‍याने 16 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या केल्याच्या घटनेला सहा दिवस उलटले तरी महसूल प्रशासनातील एकही अधिकारी त्यांच्या घरी फिरकला नाही. शेतकर्‍यांबद्दल संवेदनशून्य असलेल्या महसूल प्रशासनाच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पवार यांच्या दहाव्याचा कार्यक्रम विभागीय आयुक्‍तालयात करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्यावर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी त्यांनी बँकेत चकरा मारल्या. मात्र त्यांचे कर्ज काही माफ झाले नाही. सततच्या नापिकीमुळे कर्ज कसे फेडायचे, मुलींचे लग्न कसे करायचे, या चिंतेत कृष्णा पवार यांनी 16 फेब्रुवारी रोजी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती गावासह तालुक्यात पसरली. त्यानंतरही एकही अधिकारी, लोकप्रतिनिधी पवार कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी, त्यांना मदत मिळवून देण्यासाठी आला नाही. जिल्हाधिकारी, तहसीलदार यांनी तातडीने कार्यवाही करून पवार यांचे कर्ज त्वरित माफ करावे. उदासीन व कामचुकार अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अन्यथा त्यांच्या दहाव्याचा कार्यक्रम विभागीय आयुक्‍तालयात करण्यात येईल, असा इशारा राजपालसिंह राठोड, डॉ. कृष्णा राठोड, अनिल चव्हाण, राजू राठोड, विजय चव्हाण, रमेश पवार, एकनाथ चव्हाण, वसंत पवार, मुकेश जाधव, योगेश राठोड आदींनी बुधवारी विभागीय आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. 

कृष्णा पवार यांनी मोठ्या मुलीच्या लग्नासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. सततच्या नापिकीमुळे त्यांना हे कर्ज फेडता आले नाही. एकामागून एक दिवस सरले, कर्ज मात्र तसेच डोक्यावर राहिले. त्यात दुसर्‍या मुलीही लग्नाला आल्या. त्यांच्या लग्नाची चिंता त्यांना सतावू लागली. पहिल्या मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फिटले नाही, आता दुसर्‍या मुलींचे लग्न कसे होणार, या चिंतेने त्यांना ग्रासले होते.