Fri, Nov 16, 2018 15:01



होमपेज › Aurangabad › हमीभावासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

हमीभावासाठी शेतकर्‍यांचे आंदोलन

Published On: Feb 18 2018 1:55AM | Last Updated: Feb 18 2018 1:55AM



औरंगाबाद : प्रतिनिधी

हमीभावाप्रमाणे शेतमालाची खरेदी करण्यात यावी, तुरीची प्रतिक्विंटल पाच हजार 450 रुपयांप्रमाणे खरेदी करा, उशिराने तूर खरेदी केंद्र सुरू केल्याने शेतकर्‍यांची तीन महिने झालेली लूट भरून द्या, या मागण्यांसाठी जय किसान आंदोलन, मराठवाडा लेबर युनियन आणि स्वराज अभियानतर्फे बाजार समितीवर शनिवारी (दि. 17) आंदोलन करण्यात आले.

शेतकरी जगला, तर देश जगेल, सरसकट कर्ज माफी मिळाली पाहिजे, शेतकर्‍यांची लूट थांबवा, अशा घोषणांनी बाजार समिती परिसर दणाणून सोडला. सरकारने ठरविलेला हमी मिळत नसल्याच्या शेतकरी तक्रारी करत आहेत, तुरीचा भाव 5 हजार 450 ठरवलेला असताना व्यापारी 3800 ते 4500 भावाने खरेदी करत असून प्रतिक्विंटल नऊशे ते दीड हजारांची लूट केली जात आहे. 

उशिराने खरेदी केंद्र सुरू झाल्याने व्यापार्‍यांना कमी भावात तूर द्यावी लागली, शेतकर्‍यांच्या या लुटीस जबाबदार कोण, नोव्हेंबरमध्ये सरकारी खरेदी केंद्र सुरू का केले नाही, असे प्रश्‍न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केले. यावेळी हमाल-मापाडी महामंडळाचे सरचिटणीस सुभाष लोमटे, डॉ. सुधीर देशमुख, सरचिटणीस देविदास कीर्तीशाही यांची उपस्थिती होती.