Thu, Jan 23, 2020 05:03होमपेज › Aurangabad › फेसबुक मैत्री तरुणीला पडली महागात

फेसबुक मैत्री तरुणीला पडली महागात

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:42AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

सोशल मीडियावरील ओळखीतून आणखी एका तरुणीला छेडछाडीचा सामना करण्याची वेळ आली. कुठलीही ओळख नसताना केवळ फेसबुकवरील ओळखीतून औरंगाबाद लेणी परिसरात नेले आणि तरुणीची छेड काढली. या प्रकरणी बेगमपुरा ठाण्यात तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

अजय बोर्डे (20, रा. हमालवाडा, रेल्वे स्टेशन परिसर) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साडेसतरा वर्षीय कोमल (नाव बदललेले आहे) नावाच्या पीडितेच्या कॉलेजमध्ये आरोपी अजय अ‍ॅडमिशन घेण्यासाठी गेला होता. तेथे त्याची कोमलशी ओळख झाली. त्यातून त्याने पुन्हा तिच्याशी फेसबुकवरून मैत्री वाढविली. एकमेकांचा मोबाइल क्रमांकही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे फेसबुक हेच त्यांचे संवादाचे साधन होते. याच मैत्रीच्या ओळखीतून 8 डिसेंबर रोजी अजयने कोमलला पर्यटनासाठी जाण्याचा सल्ला दिला. त्यातून ते औरंगाबाद लेणी परिसरात चारचाकीने फिरण्यासाठी गेले. तेथे पोहोचल्यावर अजयने वाहनातच कोमलचे हात धरून तिची छेड काढली. हा प्रकार तिला आवडला नाही. त्यामुळे पीडितेने बेगमपुरा ठाण्यात अजयविरुद्ध फिर्याद दिली. 

आरोपीचा पत्ता चुकीचा

दरम्यान, बेगमपुरा ठाण्याच्या उपनिरीक्षक शेख शमा यांनी पीडितेची प्राथमिक चौकशी करून आरोपीच्या अटकेसाठी पथक पाठविले, परंतु तो मिळून आला नाही. तसेच त्याचा पत्ताही चुकीचा असल्याची माहिती समोर आली. याशिवाय आरोपीने पीडितेला मोबाईल क्रमांकही दिलेला नाही. त्यामुळे त्याचा छेड काढण्याचा उद्देश स्पष्ट होतो.