Tue, Apr 23, 2019 02:08होमपेज › Aurangabad › छावणीतील परिचारिकांची पिळवणूक : विरोध केल्यास काढून टाकण्याची धमकी

छावणीतील परिचारिकांची पिळवणूक : विरोध केल्यास काढून टाकण्याची धमकी

Published On: Aug 06 2018 1:59AM | Last Updated: Aug 08 2018 1:47AMऔरंगाबाद : हर्षवर्धन हिवराळे

छावणीतील सरकारी दवाखान्यात करारावर काम करणार्‍या परिचारिकांची ठेकेदार पिळवणूक करत असल्याचे समोर आले आहे. परिचारिकांना दरमहा 13 हजार रुपये वेतन ठरलेले असताना हातात फक्‍त 9 हजार दिले जात आहेत. याचा जाब विचारणार्‍या परिचारिकांना कामावरून काढून टाकण्याच्या धमक्या देण्यात येतात. त्यामुळे परिचारिकांनी परिषदेच्या अध्यक्षांकडे धाव घेतली.

छावणी परिसरात परिषदेचा सरकारी दवाखाना आहे. दवाखान्यात नेहमी रुग्णांची गर्दी असते. सध्या या दवाखान्यात दोन डॉक्टर, दोन कर्मचारी, दोन नर्स, फार्मास्सिट, एक ड्रेसर, एक लिपिक असा सुमारे नऊ जणांचा कायमस्वरूपी स्टाफआहे, तर सुमारे बारा डॉक्टर परिषदेमार्फत तर नऊ परिचारिका व इतर काही कर्मचारी ठेकेदारामार्फत काम करत आहेत. डॉक्टरांचा पगार हा परिषदेतर्फे करण्यात येतो. त्यामुळे त्यांना तो वेळेवर व ठरल्यानुसार मिळतो.

मात्र दवाखान्यात काम करणार्‍या परिचारिकांना ठेकेदारातर्फे पगार मिळतो. सध्या असलेल्या नऊ परिचारिकांपैकी दोघींना 16,999 व इतर सात जणींना 13 हजार रुपये ठेकेदाराने देण्याचे कबुल केले आहे. मात्र प्रत्यक्षात या सर्व परिचारिकांचे प्रत्येकी चार हजार रुपये कमी करून ठेकेदार त्यांना दोन वर्षांपासून नऊच हजार रुपये देत आहे. याबाबत परिचारिकांनी विचारपूस केल्यास त्यांना ठेकेदार काढून टाकण्याची धमकी देतो. आतादेखील याच कारणावरून तीन परिचारिकांना कामावर न येण्यास सांगितले आहे. त्यामुळे आधी मुख्य कार्यकारी अधिकारी, उपाध्यक्ष व आता अध्यक्षांकडे परिचारिकांनी धाव घेतली आहे.

काम चुकारपणा करतात

छावणी परिषदेच्या दवाखान्यात माझाच ठेका आहे. तेथे काम करणार्‍या काही परिचारिका या नेहमी कामचुकारपणा करतात. याबाबत रुग्ण व नातेवाईकांच्या परिचारिकांबद्दल तक्रारी आल्यावर रुग्णांसमोर त्यांना बोलावेच लागते. त्यामुळे त्या विनाकारण तक्रारी करत असल्याचे ठेकेदार योगेश शर्मा यांनी सांगितले.

प्रकरण लवकरच मिटवू

परिषदेच्या सरकारी दवाखान्यात ठेकेदारामार्फत काम करणार्‍या काही परिचारिका आपल्याकडे आल्या होत्या. तसेच त्यांनी परिषदेत तक्रारींचे निवेदनही दिले आहे. त्यामुळे लवकरच याविषयी बैठक घेऊन त्यामध्ये परिचारिका, डॉक्टर व ठेकेदारांची बाजू ऐकल्यावर योग्य तो निर्णय घेऊन हे प्रकरण मिटवून टाकणार असल्याचे उपाध्यक्ष प्रशांत तारगे यांनी सांगितले.