Thu, Jun 27, 2019 15:45होमपेज › Aurangabad › कुटुंबीयांसह नागरिकांची प्रेमी युगुलाला मारहाण

कुटुंबीयांसह नागरिकांची प्रेमी युगुलाला मारहाण

Published On: Dec 26 2017 1:31AM | Last Updated: Dec 26 2017 12:35AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी 

प्रियकरासोबत पळून जाणार्‍या तरुणीचा पाठलाग करून दोघांनाही पकडत कुटुंबीयांसह नागरिकांनी मारहाण केली. ही घटना सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास मूर्तीजापूर, म्हाडा कॉलनीत घडली. घटनेची माहिती मिळताच सिडको एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जोडप्याला वाचवत ताब्यात घेतले. मात्र मी त्याच्यासोबतच विवाह करणार असल्याचा पवित्रा तरुणीने घेतल्याने पोलिसांसह नातेवाईकही हतबल झाले.

पुण्यात राहणार्‍या 23 वर्षीय गीताचे रमेशसोबत (दोघांचेही नाव बदलले आहे) प्रेम जुळले होते. पुण्यात असतानाच दोघांनीही आयुष्यभरासाठी एक होण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या. ते पुण्यात एकत्र फिरतही होते. मात्र गीताच्या घरी ही कुणकुण लागताच त्यांनी रमेशचीही माहिती काढली. मात्र हा जोडा त्यांना पसंत नसल्याने त्यांनी रमेशसोबत भेटी टाळण्यासाठी व या दोघांत दुरावा निर्माण होण्यासाठी गीताला पुणे शहरातून लांब ठेवण्याचे ठरवले. त्यानुसार गीताला औरंगाबाद शहरातील म्हाडा कॉलनीतील काकाकडे पाठवले. 

महिनाभरापासून गीता काकांच्या घरी राहत होती. मात्र रमेशपासूनचा दुरावा तिला सहन होत नव्हता. तिकडे रमेशही तिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता. दरम्यान गीताने रमेशशी संपर्क साधला. आपल्याला पालकांनी औरंगाबादेतील म्हाडा कॉलनीत काकांकडे ठेवल्याचे सांगितले. तसेच येथून बाहेर पडून विवाह करण्यासाठी सोमवारी (दि. 25) म्हाडा कॉलनीत बोलावून घेतले. मात्र दुपारच्या वेळी संधी साधून पळून जात असताना कुटुंबीयांनी या दोघांना पाहिले. तत्काळ त्यांचा पाठलाग सुरू केला. हे पाहून परिसरातील नागरिकांनी दोघांना पकडले.

जमावाच्या तावडीतून पोलिसांनी सोडवले

यानंतर तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. हा प्रकार सुरू असताना शिवसेनेचे नगरसेवक मनोज गांगवे यांनी मध्यस्थी केली. तसेच सिडको एमआयडीसी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. सहायक पोलिस निरीक्षक आर. ए. जाधव यांच्यासह दाखल झालेल्या कर्मचार्‍यांनी दोघांना जमावाच्या तावडीतून सोडवत ताब्यात घेतले. 

आम्ही समवयस्क 

यानंतर पोलिसांनी गीताचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गीताने आम्ही समवयस्क आहोत. मला त्याच्यासोबतच विवाह करायचा आहे, असे सांगितल्याने पोलिसांसह कुटुंबीयांचाही नाईलाज झाला. दरम्यान, पोलिसांनी जखमी रमेशवर घाटीत उपचार केले. पुढे दोघांचे जवाब नोंदवण्यात आले. गीताचे आई-वडीलशहरात दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.