Sun, Jul 21, 2019 05:34होमपेज › Aurangabad › प्रवेश कॉलेजात अन् बायोमेट्रिक्स क्‍लासेसला

प्रवेश कॉलेजात अन् बायोमेट्रिक्स क्‍लासेसला

Published On: Jul 03 2018 1:50AM | Last Updated: Jul 03 2018 12:14AMऔरंगाबाद ः भाग्यश्री जगताप

विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात बायोमेट्रिक्स हजेरी सुरू करणार असल्याने खासगी क्‍लासेसची विद्यार्थी संख्या घटण्याचे चिन्ह दिसत आहे. त्यामुळे क्‍लासेस चालकांनी आता नवीन शक्‍कल लढवली आहे. ‘क्‍लास करायचा असेल तर आता क्‍लासेसशी टायअप असणार्‍या कॉलेजमध्येच प्रवेश घ्या, तुमचे अ‍ॅडमिशन महाविद्यालयात असेल व बायोमॅट्रिक्स हजेरी क्‍लासेसमध्ये होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, हे कदापि शक्य नसतानाही विद्यार्थ्यांची दिशाभूल क्‍लासचालकांकडून केली जात आहे. या बनवाबनवीमुळे टी. सी. काढून कॉलेज बदलणार्‍या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. 

विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये न शिकवलेल्या भागाचा सराव करता यावा म्हणून खासगी शिकवणी लावण्यात येत होती. मात्र आता खासगी शिकवणी मुख्य गरज व कॉलेज पर्यायी व्यवस्था झाल्याचे चित्र काही वर्षांपासून निर्माण झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी कॉलेजमध्ये केवळ परीक्षेच्या काळातच येतात. याला आळा बसावा व कॉलेजमध्येही नियमित तासिका व्हाव्यात म्हणून येत्या शैक्षणिक वर्षापासून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक व औरंगाबाद या पाच विभागांतील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांतील विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घेण्यात यावी, असा शासन निर्णय काढण्यात आला. त्यानुसार आता विज्ञान शाखा असणार्‍या सर्व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या हजेरीसाठी दि. 31 जुलैपर्यंत बायोमॅट्रिक्स मशीन बसविण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी महाविद्यालयांना दिले आहेत. यामुळे खासगी क्‍लासेस चालकांना क्‍लासेसचे वेळापत्रक बदलावे लागणार आहे. मात्र, काही क्‍लासेस चालकांकडून विद्यार्थ्यांना टायअप असणार्‍या महाविद्यालयात प्रवेश घ्या, असे सांगितले जात आहे. जेणेकरून बायोमॅट्रिक्स मशीन क्‍लासेसमध्ये लावले जाईल व महाविद्यालयात जाण्याची विद्यार्थ्यांना गरज पडणार नाही. यामुळे बारावीला विज्ञान शाखेला असणार्‍या विद्यार्थ्यांच्या टी. सी. काढण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. शहरातील मोठमोठ्या महाविद्यालयातून 100 ते 200 विद्यार्थ्यांनी टी. सी. काढल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.