Sun, Mar 24, 2019 10:25होमपेज › Aurangabad › पॅकेज तर सोडा, सहा हजारांत मिळतात इंजिनीअर

पॅकेज तर सोडा, सहा हजारांत मिळतात इंजिनीअर

Published On: Feb 13 2018 4:24PM | Last Updated: Feb 13 2018 4:26PMऔरंगाबाद : संजय देशपांडे

विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतनमधून दर वर्षी 23 हजार पदवी, पदविकाधारक बाहेर पडतात. मागणीच्या तुलनेत ही संख्या किती तरी जास्त असल्याचा परिणाम रोजगारांवरही होत आहे. या अभियंत्यांना पॅकेज तर सोडाच, मात्र मिळेल त्या वेतनावर काम करावे लागते. अभियांत्रिकी पदवीधरांना (बी. ई.) ‘आयटीआय’ ट्रेड करणार्‍यांपेक्षा कमी वेतनात काम करावे लागत आहे. पाच ते सात हजार रुपयांच्या तोकड्या मासिक वेतनावर करिअरची सुरुवात करणार्‍या अभियंत्यांची संख्या मराठवाड्यात लक्षणीय आहे.

मराठवाड्यात 30 अभियांत्रिकी महाविद्यालये आणि 75 तंत्रनिकेतन, अशा तंत्रशिक्षण देणार्‍या 105 संस्था आहेत. त्यातून दरवर्षी सहा हजार बी. ई. पदवीधारक, 16 हजार पदविकाधारक अभियंते तयार होत असतात. तुरळक अपवाद वगळता अनेक संस्थांमध्ये उच्च दर्जाच्या पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा, तज्ज्ञ प्राध्यापकांचा अभाव आहे. परिणामी या संस्थांमधून तयार होणारे अभियंते उद्योगांना पाहिजे तसे नसतात. तसेच उद्योगांच्या मागणीपेक्षा दरवर्षी कॉलेजमधून बाहेर पडणार्‍या अभियंत्यांची संख्या किती तरी जास्त असल्याने मिळेल त्या वेतनावर काम करण्याची वेळ त्यांच्यावर येते.

बजाज ऑटोसारखे काही मोठे उद्योग सोडल्यास बहुतांश आस्थापनांना पदविकाधारकांची आवश्यकता असते. मात्र पदवीधरांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण जास्त असल्याने पदवीधारकांच्या जागेवर काम करण्यास ते तयार होतात. पदविकाधारकांच्या जागी पदवीधारक उमेदवार कमी वेतनात मिळत असल्याने पॅकेज देण्याची मानसिकता उद्योजकांमध्ये राहिली नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम ः नोटाबंदी, जीएसटी लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून उद्योगांवर काहीसे मंदीचे सावट आहे. अनेक उद्योगांनी आपले विस्तारीकरण प्रकल्प तूर्त स्थगित केले आहेत. परिणामी नोकर भरतीही थंडावली आहे. इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, माहिती तंत्रज्ञान (आयटी) या विद्याशाखांना अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांना विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. या शाखा बंद करण्याची परवानगी अनेक महाविद्यालये मागत आहेत.


मुंबई, पुण्यात राहणीमानाचा खर्च मोठा असतो. शहराच्या कॉस्ट ऑफ लिव्िंहगच्या तुलनेत तेथे काम करणार्‍यांना अधिक वेतन मिळते. औरंगाबादेत हा खर्च कमी असल्याने कर्मचार्‍यांना वेतनही कमी मिळत असते. नोटाबंदी, जीएसटीचा उद्योगांमधील नोकर भरतीवर फारसा परिणाम झालेला नाही.
- आशिष गर्दे, उद्योजक

मराठवाड्यातील महाविद्यालयांमधून बाहेर पडणारे अभियंते ‘सॉफ्ट स्कील’मध्ये पिछाडीवर असल्याचे निरीक्षण काही संस्थांनी नोंदवले आहे. या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा विकास करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. विभागातील पदवीधर अभियंत्यांना वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतच्या नोकर्‍या मिळत आहेत.
- महेश शिवणकर, तंत्रशिक्षण सहसंचालक