Thu, Jul 18, 2019 10:47होमपेज › Aurangabad › मडी महल प्रकरणातील व्हिडिओ  शूटिंग तपासणार ः आयुक्‍त मुगळीकर

मडी महल प्रकरणातील व्हिडिओ  शूटिंग तपासणार ः आयुक्‍त मुगळीकर

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 02 2018 12:18AM

बुकमार्क करा
औरंगाबाद : प्रतिनिधी

दमडी महलजवळील अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत नेमके काय झाले, तिथे कोणी दबाव टाकला हे आत्ताच सांगता येणार नाही, परंतु तेथील कारवाईची व्हिडिओ शूटिंग तपासली जाईल. त्यात कुणी हस्तक्षेप केल्याचे आढळले तर त्यांच्यावर नक्‍कीच कारवाई केली जाईल, असे मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे एमआयएमचे नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी दमडी महलजवळील विकास रस्त्यातील श्रीराम पवार यांचे घर निष्कासित केले. या कारवाईसाठी एमआयएमच्या नगरसेवकांनी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू केला होता. सभापती गजानन बारवाल यांनीही स्थायी समितीच्या बैठकीत अधिकार्‍यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मनपाचे पथक कारवाईसाठी तिथे गेले. त्यांच्या पाठोपाठ एमआयएमचे नेते गफ्फार कादरी, मनपातील विरोधी पक्षनेते फेरोज खान, गटनेते नासेर सिद्दीकी यांच्यासह एमआयएमचे नगरसेवकही तिथे दाखल झाले. त्यांनी अतिक्रमण हटाव पथकाला पवार यांचे संपूर्ण घर पाडायला लावले. त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्‍तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत एमआयएमच्या नगरसेवकांविरुद्ध कारवाईची मागणी केली. 

या विषयावर मनपा आयुक्‍त दीपक मुगळीकर म्हणाले की,  कोणत्याही अतिक्रमणाचे समर्थन करता येणार नाही. शहरातील अतिक्रमण काढण्याची कारवाई यापुढेही सुरूच राहील. विकास कामाआड येणारे अतिक्रमण काढून रस्ते मोकळे केले जातील. दमडी महल येथील अतिक्रमण काढल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. तिथे कोणी हस्तक्षेप केला किंवा नाही हे तपासले जाईल. तेथील कारवाईचे व्हिडिओ शूटिंग तपासण्यात येईल. त्यात कुणी हस्तक्षेप केल्याचे आढळले तर त्यांच्यावर नक्‍कीच कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

दमडी महलजवळील कारवाईवेळी त्यात हस्तक्षेप करणार्‍या एमआयएम नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करावे, अशी मागणी भाजपच्या वतीने उपमहापौर विजय औताडे आणि पक्षाचे मनपातील गट नेते प्रमोद राठोड यांनी सोमवारी मनपा आयुक्‍तांकडे केली. या दोन्ही पदाधिकार्‍यांनी आयुक्‍तांना स्वतंत्र निवेदन सादर केले. कारवाईच्या वेळी तिथे हजर राहून एमआयएमच्या नगरसेवकांनी पथकावर दबाव आणला. त्यांनी पथकातील अधिकार्‍यांना असंसदीय भाषा वापरली.

तसेच कारवाईनंतर फटाके फोडून आनंद साजरा केला. त्याची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाल्याने मनपाची प्रतिमा मलिन झाली आहे. अशा पद्धतीने कारवाईत हस्तक्षेप करणे हे शासकीय कामात अडथळा आणल्यासारखे आहे. त्यामुळे तिथे हजर सर्व नगरसेवकांविरुद्ध कारवाई करावी, असे उपमहापौर औताडे आणि गटनेते प्रमोद राठोड यांनी निवेदनात म्हटले आहे.