Thu, Jul 18, 2019 20:58होमपेज › Aurangabad › कधीही बंद होऊ शकते शहराचे पाणी अन् पथदिव्यांची लाईट !

कधीही बंद होऊ शकते शहराचे पाणी अन् पथदिव्यांची लाईट !

Published On: Dec 15 2017 2:43AM | Last Updated: Dec 15 2017 12:29AM

बुकमार्क करा

औरंगाबाद : प्रतिनिधी

तिजोरीत खडखडाट असलेल्या औरंगाबाद महापालिकेला ठेकेदारांची बिले अदा करण्यासाठी आपली मालमत्ता गहाण ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. त्यातच आता आणखी एखादी मालमत्ता गहाण ठेवण्याची वेळ मनपावर येऊ शकते. कारण महावितरणचे पाणीपुरवठा आणि पथदिव्यांच्या वीज बिलाचे तब्बल दहा कोटी रुपये मनपाकडे थकले आहेत. हे बिल भरण्यासाठीही मनपाकडे सध्या पैसे नाहीत अन् बिल अदा करण्यासाठी आणखी एखादी मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढून बिल अदा करण्याशिवाय मनपाकडे पर्यायही नाही. नाही तर कोणत्याही क्षणी महावितरण मनपाच्या पाणीपुरवठा आणि पथदिव्यांची वीज कापू शकते.

करवसुलीकडे मनपाचे लक्षच नाही. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. इकडून तिकडून मिळालेला निधी व त्यावरील व्याजावरच सध्या मनपाचा कारभार सुरू आहे. तिजोरीत खडखडाट असल्याने भूमिगतच्या ठेकेदाराचे बिल अदा करण्यासाठी चक्‍क मनपाने आपल्या मुख्यालयाच्या इमारतीसह शहरातील आपल्या मालकीच्या मोक्याच्या मालमत्ता गहाण ठेवून कर्ज काढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यातच आता महावितरणने थकबाकी भरण्यासाठी तगादा लावल्याने मनपाच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे. 

अनेक महिन्यांपासून थकले बिल

शहरातील पथदिव्यांसाठी आणि जायकवाडीतून पाणी पुरवठा करण्यासाठी मनपाने महावितरणकडून वीज पुरवठा घेतलेला आहे. विशेष म्हणजे डबघाईला आलेल्या मनपाने गेल्या नऊ महिन्यांपासून शहरातील पथदिव्यांचे बिलच भरलेले नाही. त्यामुळे पथदिव्यांच्या बिलांची थकबाकी तब्बल 9 कोटी रुपयांवर पोहचली आहे. तर पाणीपुरवठ्याच्या वीज बिलाचीही अवस्था अशीच आहे. आज पाणीपुरवठ्याची थकबाकीही 1 कोटी 19 लाख 30 हजारांपर्यंत पोहचली आहे. पाणीपुरवठा आणि पथदिवे या दोघांची मिळून मनपाकडे महावितरणचे तब्बल 10 कोटी 19 लाख 30 हजार रुपये थकलेले आहेत. 

बिलासाठी पैसेच नाहीत

थकबाकी भरण्याबाबत महावितरणने मनपाला अनेकदा सूचना केल्या आहेत. आता वीज खंडित करण्याचा इशाराच महावितरणने देऊन टाकला आहे. प्रत्यक्षात मनपाकडे ही थकबाकी भरण्यासाठी सध्या पैसेच नाहीत. ही रक्‍कम भरण्यासाठी मनपाला आता एखाद्या बँकेकडून कर्ज काढण्याची वेळ आलेली आहे. कर्ज काढायचे म्हणजे पुन्हा त्यासाठी काही तरी मालमत्ता गहाण ठेवण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावेल. मालमत्ता कराच्या वसुलीकडे मनपा अधिकारी, कर्मचार्‍यांचे होत असलेले दुर्लक्ष आणि या दुर्लक्षाकडे प्रशासन करीत असलेला कानाडोळा, यामुळेच मनपाची स्थिती अशी बिकट बनलेली आहे. 

कोणत्याही क्षणी कारवाई

मनपाकडे पाणी पुरवठा आणि पथदिव्यांच्या वीज बिलाचे एकूण दहा कोटी रुपये थकले आहेत. त्यांना अनेकदा सूचना केल्या आहेत. मात्र, प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लवकरच मनपावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात येईल. त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल.