Fri, Jul 19, 2019 22:22होमपेज › Aurangabad › संत एकनाथ कारखान्याला राजकीय महत्त्वाकांक्षेचे ग्रहण

संत एकनाथ कारखान्याला राजकीय महत्त्वाकांक्षेचे ग्रहण

Published On: Apr 24 2018 1:04AM | Last Updated: Apr 24 2018 12:30AMपैठण : गौतम बनकर 

कामकाजात अनियमितता केल्याचा ठपका ठेवत येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश सहकारी संस्थेच्या सहनिबंधक तथा साखर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक नीलिमा गायकवाड यांनी दिले आहेत. त्यामुळे तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या या कारखान्याला गेल्या आठ वर्षांपासून राजकीय महत्त्वाकांक्षेचे ग्रहण लागले आहे. या कारवाईमुळे हा कारखाना पुढील हंगामात सुरू होतो, की नाही, अशी भीती ऊस उत्पादक शेतकर्‍यांसह कामगारांत व्यक्त केली जात आहे. 

तालुक्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या कारखान्याच्या घडामोडीवर शेतकरी, कामगार व तालुक्यातील जनतेने लक्ष राहले आहे. कै. पंढरीनाथ पाटील शिसोदे यांनी प्रचंड मेहनत घेऊन या कारखान्याची मुहूर्तमेढ 1980 साली रोवली. त्यानंतर हा कारखाना सुरू झाला. कारखान्यातून उत्पादित झालेल्या पहिल्या गळीत हंगामातील साखर पंढरीनाथ पाटलांनी शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज यांच्या चरणी अर्पण केली. या कारखान्यांमुळे तालुक्यातील शेतकरी, कामगार यांचे भले झाले पाहिजे, अशी निःस्वार्थी भावना त्यांची कारखाना उभारण्यामागे होती. आज पंढरीनाथ पाटलांच्या कार्याची आठवण तालुक्यातील जनतेला आहे. पंढरीनाथ पाटलानंतर तत्कालीन आमदार शिवाजी काळे यांच्या हाती या कारखान्याची सूत्रे आली. त्यांनी आहे त्या भाग भांडवलावर कारखान्याचे दोन गाळप केले. नंतर कारखान्याची निवडणूक लागली आणि शेतकर्‍यांनी पंढरीनाथ पाटलांचे नातू राज्याचे तत्कालीन गृहमंत्री कल्याणराव पाटील शिसोदे यांच्या हातात कारखान्याचा कारभार दिला. काही दिवसांनंतर त्यांचे बंधू सुदामराव शिसोदे यांनी कल्याणराव यांना पदावरून पायउतार करून कारखान्यावर ताबा घेतला.

कारखाना सुरळीतपणे सुरू असतानाच आमदारकी मिळताच संदिपान भुमरे यांनी राजकीय दबाव तंत्राचा वापर करत कारखाना ताब्यात घेतला आणि काही महिन्यांनंतर त्यांनी चेअरमनपदाचा राजीनामाही दिला. नंतरच्या काळात माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांचे सुपुत्र अप्पासाहेब पाटील कारखान्याचे चेअरमन झाले. त्यांनी चार वर्षे कारखाना चांगला चालविला. कामगारांची देणी दिली. कारखान्याकडे असलेली 17 कोटींच्या कर्जाची परतफेडही केली. नंतरच्या काळात निवडणूक झाली आणि पुन्हा या कारखान्यावर आमदार भुमरे यांची सत्ता आली. त्यांनी आपले विश्‍वासू मित्र  अंकुश रंधे यांना चेअरमन केले. आमदार भुमरे व चेअरमन रंधे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या वैजिनाथ साखर कारखान्याला भाडे तत्त्वावर संत एकनाथ कारखाना चालवण्यासाठी दिला. या कारखान्याने चार वर्षे कारखाना व्यवस्थित चालवला. कामगारांचे पगार दिले. कारखान्याचेही कर्ज फेडले. स्व. मुंडे यांच्या निधनानंतर कारखाना बंद पडला. त्यांनतर आमदार भुमरेंनी हा कारखाना सचिन घायाळ यांच्या शुगर मिलला भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिला. या कंपनीने एक गळीत हंगाम पूर्ण केला.

दुसरा गळीत हंगाम अर्ध्यावर सोडून शेतकरी, कामगार यांना अंधारात ठेवून कारखाना बंद करून गेटला कुलूप लावले. याकाळात घायाळ यांनी कारखान्यावरचे कर्ज फेडले नाही. कामगारांना अठरा महिने घरी बसवले. कामगारांचे 18 कोटी देणी दिली नाही. असे कामगार सांगतात. कारखाना बंद अवस्थेत असताना निवडणूक झाली आणि भाजपचे तुषार पाटील शिसोदे यांची चेअरमनपदी वर्णी लागली. त्यांनी एक वर्ष कारखाना बंद ठेवला. यावर्षी संचालक मंडळाने वार्षिक सर्वसाधारण सभेत संत एकनाथने सचिन घायाळ यांच्याशी केलेला करार रद्द करून कारखान्याचा गळीत हंगाम पूर्ण केला. कारखाना सुरळीतपणे चालू असताना सचिन घायाळ यांनी संचालक मंडळाला कायद्याच्या चौकटीत हैराण केले. पुढील वर्षी कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होईल की नाही, असा प्रश्‍न शेतकरी कामगारांत उपस्थित केला जात आहे.

Tags : Aurangabad, Eclipse,  political, ambition,  Saint Eknath, Factories