Sat, Jan 19, 2019 09:37होमपेज › Aurangabad › इको सेंसिटिव्ह झोनचा ‘विकास’च रखडला

इको सेंसिटिव्ह झोनचा ‘विकास’च रखडला

Published On: Feb 12 2018 1:48AM | Last Updated: Feb 12 2018 12:50AMऔरंगाबाद : जितेंद्र विसपुते

जिल्ह्यातील गौताळा आणि जायकवाडी अभयारण्याचा परिसर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून इको सेंसिटिव्ह झोन म्हणून जाहीर केला आहे. त्यांची अधिसूचना प्रसिद्ध झालेली आहे. मात्र या अभयारण्यातील इको सेंसिटिव्ह झोनचा दीर्घकालीन विकास आराखडा तयार करण्याचाच वन विभागाला विसर पडला आहे. 

पर्यावरण मंत्रालयाकडून जायकवाडी पक्षी अभयारण्य आणि गौताळा औट्राम घाट अभयारण्य (अभयारण्य परिसरापासूनचा काही भाग) इको सेंसिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अभयारण्यांच्या संवर्धन आणि विकासाकरिता हे झोन जाहीर करण्यात आले. याची अधिसूचना जाहीर झालेली आहे. अधिसूचना जाहीर झाल्यानंतर संनियंत्रण समिती तयार करण्यात आली. या समितीला अभयारण्यांसाठी झोनल मास्टर प्लॉन तयार (दीर्घकालीन विकास आराखडा) करायचा आहे. मात्र दफ्तरदिरंगाईमुळे विकास आरखड्याचे काम रखडले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या संनियंत्रण समितीच्या बैठकीतही याबाबत चर्चा झालेली नाही. 

उपवनसंरक्षक अर्थात संनियंत्रण समितीचे सदस्य सचिव सतिश वडतकर यांनी याबाबत प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी वरिष्ठांकडे हा विषय मांडत मार्गदर्शन मागितले होते. मात्र वरिष्ठांकडूनही त्यांना याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान यातून मार्ग काढत निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांंत्रिकी संशोधन संस्था) या संस्थेकडून हा आराखडा तयार करुन घेण्याचा प्रयत्न झाला होता.  मात्र आराखडा तयार करण्यासाठी येणारा खर्च लाखो रुपयांचा घरात असल्याने वरिष्ठांनी त्यासही परवानगी नाकारली.