Mon, Mar 25, 2019 09:07होमपेज › Aurangabad › ई-वाहनांना मिळेल घरगुती दराने वीज 

ई-वाहनांना मिळेल घरगुती दराने वीज 

Published On: Feb 17 2018 2:05AM | Last Updated: Feb 17 2018 12:44AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

ई-वाहनांच्या चार्जिंगसाठी घरगुती दराने वीज पुरवठा केला जाईल, अशी घोषणा राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी  शुक्रवारी येथे केली. ‘सीएमआयए’च्या वतीने पीपल्स अभियांत्रिकी महाविद्यालयात ई-वाहनांवर घेण्यात आलेल्या परिषदेत ते बोलत होते. सीएमआयएचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, प्राचार्य डॉ. अभिजित वाडेकर, र्‍हीमन मोटर्सचे संस्थापक डॉ. ऋषेन चहेल, मुंबई आयआयटीचे प्रा. के. मुन्शी, मिताली मिश्रा यांची प्रमुख उपस्थिती होती.

राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या ई-वाहन धोरणाची माहिती देसाई यांनी दिली. पारंपरिक वाहनांमुळे इंधनाचा खप प्रचंड वाढला असून, प्रदूषणाचे प्रश्‍न त्यातून निर्माण होत आहेत. ई-वाहनांचा वापर हा त्यावर एकमेव पर्याय आहे. ई-वाहन निर्मितीस राज्य सरकार चालना देत आहे. ई-वाहनांचे उत्पादक, बॅटरी व सुटे भाग तयार करणारे कारखाने, चार्जर उत्पादक यांची साखळी आगामी काळात तयार होणार आहे. पेट्रोल पंपाच्या जागा चार्जिंग स्टेशन घेणार आहेत. चार्जिंगसाठी स्टेशनवर गाड्यांची गर्दी होऊ नये, यासाठी विविध पर्यायांची चाचपणी केली जात असून, पार्किंगच्या ठिकाणी चार्जिंगची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे. चार्जिंगसाठी ग्राहकांना घरगुती वापराच्या दराने स्वस्त वीज उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

लघुउद्योगांचे शेअर घेणार
राज्यातील शंभरावर लघुउद्योगांनी वर्षभरात आपल्या कंपन्या शेअर बाजारात लिस्टिंग केल्या आहेत. शेअर बाजारात नोंदणी करणार्‍या लघुउद्योगांचे काही शेअर राज्य सरकार विकत घेईल. यामुळे लघुउद्योगांना प्रोत्साहन तर मिळेलच, पण सरकारने शेअर विकत घेतल्याचा अभिमानही त्यांना वाटेल, असे सुभाष देसाई यांनी सांगितले. राज्य सरकार, पॅन्टोमॅथ इन्व्हेस्टर आणि सीएसआर फाउंडेशन यांच्या वतीने हॉटेल ताजमध्ये घेण्यात आलेल्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पॅन्टोमॅथचे संस्थापक महावीर लुनावत, यस बँकेचे नीरज माडेकर, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, सुनील किर्दक, आशिष गर्दे आदी या वेळी उपस्थित होते. महिला उद्योजकांच्या कर्जातील पाच टक्के व्याज राज्य सरकार भरणार असून, प्रदर्शनानिमित्त त्यांनी केलेल्या दौर्‍याचा खर्चही उचलला जाणार असल्याचे देसाई यांनी नमूद केले.